पुणे : पीएमपीमध्ये अनेक कर्मचारी उच्चशिक्षित असूनही ते चालक-वाहक म्हणूनच सेवा बजावत आहेत. मात्र, आता पीएमपी प्रशासनाने या सुशिक्षित कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा योग्य वापर करण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे अशा उच्चशिक्षित चालक-वाहकांना त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार टेबल वर्कची संधी मिळणार आहे.(Latest Pune News)
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी हा नवा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत, ज्या चालक-वाहकांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे, त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार पीएमपीच्या आयटी विभाग, क्लेरिकल (लिपिकवर्गीय) विभाग किंवा थेट मुख्यालयातील प्रशासकीय कामांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून फक्त बस चालवणे किंवा तिकीट वाटप करणे एवढेच काम करणाऱ्या, पण उच्च शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. आपल्या शिक्षणाचा खऱ्या अर्थाने संस्थेसाठी उपयोग होणार आणि करिअरला नवी दिशा मिळणार, या भावनेने कर्मचारी वर्ग आनंदी झाला आहे.
या नव्या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने बुधवारी येत्या 12 तारखेला (नोव्हेंबर) पीएमपीच्या ताफ्यातील सर्व पदव्युत्तर पदवीधर शिक्षण घेतलेल्या चालक-वाहकांना मुख्यालयात असलेल्या हॉलमध्ये बोलावले आहे. या दिवशी सकाळी, सर्व पात्र कर्मचाऱ्यांना त्यांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेऊन हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे हे स्वतः या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत. या मुलाखतींद्वारे कर्मचाऱ्याची शैक्षणिक पात्रता, आवड आणि प्रशासकीय कामाची जाण तपासून त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार योग्य टेबलवरील काम (कार्यालयीन काम) दिले जाणार आहे.
पीएमपीएमएल हा एक मोठा परिवार आहे. आमच्या अनेक चालक-वाहकांनी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांचे हे ज्ञान आणि कौशल्य फक्त स्टिअरिंग व्हील किंवा तिकीट मशीनपुरते मर्यादित राहू नये, असे आम्हाला वाटते. या उपक्रमातून आपण योग्य व्यक्तीला योग्य काम हे तत्त्व अंमलात आणत आहोत. जे कर्मचारी पोस्ट ग््रॉज्युएट आहेत, त्यांना आयटी, क्लेरिकल किंवा मुख्यालयीन कामकाजात संधी दिल्यास, त्यांच्या ज्ञानाचा संस्थेच्या प्रशासकीय सुधारणेसाठी थेट फायदा होईल. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य तर उंचावेलच, पण त्याचसोबत पीएमपीच्या प्रशासकीय कामकाजालाही अधिक गती आणि अचूकता मिळेल. हा संस्थेच्या आणि कर्मचाऱ्यांच्या, अशा दोघांच्याही हिताचा निर्णय घेतला आहे. येत्या 12 तारखेला मी स्वत: त्यांच्या मुलाखती घेणार आहे.पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल