पुणे

Pune : पीएमपी चालकास मद्यधुंद युवकांची मारहाण

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  वेल्हे-नसरापूर रस्त्यावरील आंबवणे (ता. वेल्हे) येथील तळेकर वस्ती थांब्याजवळ पुण्याकडे जाणारी पीएमपीएल बस अडवून मद्यधुंद युवकांनी चालकाला बेदम मारहाण केली. त्यात बसचालक तेजस चंद्रकांत गायकवाड (वय 35, रा. माउलीनगर, शेलार मळा, पुणे) यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी नीलेश पंढरीनाथ सरपाले (वय 26, रा. माळवाडी, सोंडे सरपाले, ता. वेल्हा) यास अटक केली आहे. दुसरा हल्लेखोर श्रेयस काळुराम सरपाले (वय 20, रा. सोंडे सरपाले) हा फरार झाला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 20) दुपारी चार वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विंझर (ता. वेल्हे) येथून बस पुण्याकडे चालली होती. आंबवणे गावाजवळ बसच्या पुढे कार (एमएच 12 पीक्यू 7137) ही वेडीवाकडी चालली होती. त्यामुळे बसचालक गायकवाड यांनी हॉर्न वाजवून कार बाजूला घेण्याचा इशारा दिला. कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्यासोबत दोन अल्पवयीन मुले व एक युवक असे चौघे जण होते. आंबवणे येथील तळेकर वस्ती थांब्याजवळ कारचालकाने बस रोखून धरली. त्यामुळे बसमधील प्रवासी घाबरले. श्रेयस सरपाले याने गायकवाड यांना शिवीगाळ करत बिअरची बाटली बसच्या टायरवर फोडली. त्यानंतर बसचालकाच्या केबिनचा दरवाजा उघडून गायकवाड यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत गायकवाड यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने श्रेयस सरपाले व त्याचे साथीदार कारमधून पसार झाले.

याप्रकरणी बसचालक गायकवाड यांनी नीलेश व श्रेयस सरपाले यांच्या विरोधात वेल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कदम तपास करीत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT