पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार; पीएमपीने भाडेदरात मोठी वाढ  PMPML
पुणे

PMP Fare Hike: पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार; पीएमपीने भाडेदरात मोठी वाढ

नवीन तिकीट दराची पंधरा दिवसांत होणार अंमलबजावणी

प्रसाद जगताप

पुणे: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीने भाडेदरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. या निर्णयानुसार, आतापर्यंत पहिल्या टप्प्यासाठी असलेल्या पाच रुपयांच्या तिकिटाचे दर दुप्पट म्हणजेच थेट दहा रुपये झाले आहेत. प्रशासनाने किलोमीटरनुसार सुधारित भाडेवाढ लागू केली असून, दैनंदिन पासच्या किमतीतही वाढ केली आहे. 

पीएमपीने दिलेल्या माहितीनुसार, ही भाडेवाढ पुढील पंधरा दिवसांत अमलात येईल, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. मंगळवारी (दि.13) पीएमपीच्या मुख्यालयात संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली.  (Latest Pune News)

या बैठकीत पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले (ऑनलाईन), पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह (ऑनलाईन), पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह पीएमपीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पीएमपी प्रशासनाने भाडेवाढीचा प्रस्ताव मांडला आणि संचालक मंडळाने त्याला मान्यता दिली.

नवीन भाडेदरानुसार, प्रवासी तिकीट, टप्पे आणि पासच्या दरांमध्ये बदल करण्यात आले आहेत, यामुळे प्रवाशांवर आर्थिक भार वाढणार आहे. यापूर्वी डिसेंबर २०१४ मध्ये भाडेवाढ झाली होती आणि आता तब्बल अकरा वर्षांनंतर ही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी १ ते ७८ किलोमीटरसाठी २ किलोमीटरच्या अंतराने १ ते ४० टप्प्यांमध्ये भाडे आकारले जात होते.

मात्र, आता भाडेप्रणालीत बदल करून पहिल्या १ ते ३० किलोमीटरसाठी ५ किलोमीटरच्या अंतराने ६ टप्पे आणि त्यानंतर ३० ते ८० किलोमीटरसाठी १० किलोमीटरच्या अंतराने ५ टप्पे, असे एकूण ११ टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.

पूर्वी ४० टप्पे आणि २ किलोमीटरचे अंतर असलेली रचना आता सुधारली आहे. नवीन दरानुसार, १ ते ५ किलोमीटरच्या प्रवासासाठी आता १० रुपये मोजावे लागतील. यापूर्वी पहिल्या दोन किलोमीटरसाठी ५ रुपयांचे तिकीट उपलब्ध होते. लहान मुलांसाठी (३ ते १२ वर्षे वयोगट) तिकीट दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. असे पीएमपीकडून सांगण्यात आले आहे.

पासच्या दरातही वाढ.....

 पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी असलेले वेगवेगळे दैनिक आणि मासिक पास आता रद्द करण्यात आले असून, त्याऐवजी एकत्रित पास प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, एकत्रित दैनिक पास ७० रुपये आणि मासिक पास १ हजार ५०० रुपये इतका असेल.

पूर्वी एका शहरासाठी ४० रुपयांचा दैनिक पास उपलब्ध होता. पीएमआरडीए क्षेत्रासाठीचा दैनिक पास १२० रुपयांवरून १५० रुपयांवर वाढवण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या सवलतीच्या पासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मागील अकरा वर्षांपासून पीएमपीएमएलने कोणतीही भाडेवाढ केलेली नव्हती. भाडेदर फेररचनेचा प्रस्ताव तयार केला होता आणि त्याला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. तांत्रिक कामे पूर्ण झाल्यावर पुढील पंधरा दिवसांत सुधारित दराने तिकीट आकारणी सुरू केली जाईल.
- दिपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT