

खेड : तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तापलेली जमीन थंड झाली असली, तरी पाणीटंचाईची समस्या जैसे थे आहे. घेरारसाळगड येथील 4, तर तिसंगी येथील 2 वाड्या तहानलेल्या असून टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. सर्वाधिक पाणीटंचाईची झळ धनगरवाड्यांतील ग्रामस्थांना बसत आहे. रस्त्यांअभावी गावात टँकर पोहोचण्यास अडचणी येत आहे. यामुळे हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना डोंगर चढून पायपीट करावी लागत आहे.
तालुक्यात यंदा टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. ही प्रशासनासह ग्रामस्थांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे. प्रशासकीय यंत्रणेने याबाबत वर्षभर राबवलेल्या उपाययोजनांचे हे फलित म्हणावे लागेल. मात्र धनगरवाड्यांमध्ये नळपाणी योजना राबवण्यात निर्माण होणार्या अडथळ्यांमुळे पाणीटंचाई पाचवीला पुजल्यासारखीच आहे. अवघा दिवस पाण्यासाठी वेचणार्या धनगरवाड्या ग्रामस्थ हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करत डोंगर चढत आहेत, सद्यस्थितीत चिरणी-धनगरवाडी, खवटी खालची व वरची धनगरवाडी, सवेणी-धनगरवाडी, घेरारसाळगड - धनगरवाडीची तहान टँकरच्या पाण्यावर भागत आहे.
या ठिकाणी प्रशासनाकडून एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी रस्त्यांअभावी टँकर पोहोचण्यास अडसर निर्माण होत असल्याने ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. तिसंगी-धनगरवाडी, घेरारसाळगड-मराडेवाडी येथेही पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. घेरारसाळगड-पेठवाडी, तांबडवाडी, बौद्धवाडी, तिसंगी-खांडेकरवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. या वाड्यांमध्ये ग्रामस्थ अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचा पाणी विभागही सतर्क झाला आहे.