पुणे: पीएमपीच्या स्वमालकीच्या बसमुळे अपघात झालेल्यांना पूर्वी ५० हजार रुपये तातडीची मदत दिली जात होती; तर अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये दिले जात होते. मात्र, संचालक मंडळाच्या सोमवारी (दि. २४) झालेल्या बैठकीत या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता अपघात झालेल्यांना १ लाख, तर मृतकांच्या कुटुंबीयांना ३ लाख रुपयांची आर्थिक मदत पीएमपीकडून दिली जाणार आहे, अशी माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली.
पुणे महापालिकेच्या सभागृहात पीएमपीएमएलची विशेष सभा झाली. त्यानंतर महापौर मंजूषा नागपुरे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबत पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा प्रस्ताव मान्य केला.
या बैठकीस महापौर मंजूषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पुणे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक मारणे, पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, तसेच पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड आदी उपस्थित होते. तसेच, बस अपघातात मालमत्तेचे नुकसान झालेल्यांनाही आर्थिक मदत देण्याबाबतचे धोरण या बैठकीत निश्चित करण्यात आले.
दुकानदारांना आर्थिक मदत
या धोरणानुसार २१ एप्रिल २०२६ रोजी अप्पा बळवंत चौक, प्रभात टॉकीजजवळ झालेल्या बस अपघातात नुकसान झालेल्या दोन दुकानांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. ओ. व्ही. शेवाडे अँड असोसिएट्स या चार्टर्ड इंजिनिअर्स व शासकीय मूल्यांकनकर्त्यांनी केलेल्या मूल्यांकनानुसार मे. प्रकाश कार्ड्सचे मालक विनोद पतंगे यांना ४ लाख ७० हजार ५३१ रुपये, तर बालाजी कार्ड्सचे मालक आकाश धनसिंग नायकडा यांना ४५ हजार ९६२ रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.