Tanker Owners Protest Pudhari File photo
पुणे

Pune Water Tanker SOP: जीपीएस, दरपत्रक, ऑनलाइन बुकिंग अनिवार्य; टँकर व्यवस्थेत मोठे बदल

टँकर पाणीपुरवठ्यासाठी तातडीने एसओपी करण्याचे स्थायी समितीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे : शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी महापालिकेने तातडीने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) तयार करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला दिले. टँकरच्या वाढत्या मागणीमुळे निर्माण झालेली अनियमितता, चढ्या दराने होणारी पाणीविक्री आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत प्रशासनाकडून महापालिका व खासगी टँकरची संख्या, टँकर भरणा केंद्रांची क्षमता, अधिकृत दर, चालकांची पात्रता, जीपीएस सुविधा, ऑनलाइन बुकिंग व्यवस्था, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, नियंत्रण कक्ष आणि अपघातांच्या आकडेवारीबाबत सविस्तर माहिती मागवण्यात आली.

स्थायी समितीने एसओपीमध्ये सर्व टँकरसाठी अधिकृत दरपत्रक जाहीर करणे, प्रत्येक टँकरवर दरफलक लावणे, जीपीएस प्रणाली बसविणे, नागरिकांसाठी मोबाईल ॲपद्वारे टँकर ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध करणे तसेच ऑनलाइन आणि हेल्पलाईनच्या माध्यमातून पारदर्शक बुकिंग व्यवस्था सुरू करून 'पहिली मागणी; पहिला पुरवठा' हे तत्त्व लागू करण्याचे निर्देश दिले.

याशिवाय चालकांचे नियमित प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी, मद्य व अमली पदार्थ चाचणी, वेगमर्यादा, परावर्तित पट्ट्या, सुरक्षा दिवे, ब्लाइंड स्पॉट मिरर, रिव्हर्स कॅमेरे आणि अलार्म प्रणाली अनिवार्य करण्याची सूचना करण्यात आली.

तसेच प्रत्येक टँकरमधील पाण्याची नियमित गुणवत्ता तपासणी, क्लोरीनेशन, दूषित पाणीपुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई, खासगी टँकरची नोंदणी, वार्षिक फिटनेस प्रमाणपत्र आणि नियमभंग करणाऱ्यांची ब्लॅक लिस्ट तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले.

नागरिकांच्या तक्रारींसाठी २४ बाय ७ हेल्पलाईन, २४ तासांत तक्रार निवारण, पाणीटंचाईग्रस्त भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा आणि रुग्णालये, शाळा, पोलिस ठाणी तसेच अग्निशमन केंद्रांना प्राधान्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT