पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून दुकानांच्या पाट्यांना (नामफलक) शुल्क आकारणीच्या नोटिसा बजाविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेने ठरवून दिलेल्या नामफलकापेक्षा जास्त आकाराचे फलक आणि त्यावर कंपन्यांची जाहिरात करणार्या दुकानदारांना नोटीस बजाविण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. नामफलक आणि जाहिरात फलक यात पालिका गफलत करीत असल्याचा आरोप व्यापारी महासंघाने केला आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या नियमावलीनुसार शहरातील दुकानांवरील तीन फूट उंच आणि दुकानांची लांबी या आकारातील पाट्यांना शुल्क आकारले जात नाही. मात्र, या आकारापेक्षा जास्त आकाराच्या पाट्या लावणार्या आणि त्यावर विविध कंपन्यांची जाहिरात करणार्या दुकानांचा एका खासगी संस्थेमार्फत सर्व्हे करण्यात आला होता.
त्यानुसार अशा दुकानांना आता आकाशचिन्ह विभागाने नोटिसा बजावून त्यानुसार शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या नोटिसांविरोधात व्यापारी महासंघाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सरचिटणीस महेंद्र पितळीया, नितीन काकडे, मिलिद शालगर, अजित सांगळे आदींचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची मंगळवारी भेट घेतली.
राज्य सरकारने सूट दिल्यानंतरही महापालिकेने व्यापार्यांकडून शुल्क घेतले आहे, असा दावा या शिष्टमंडळाने केला. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून दुकानांवरील जाहिरातीचे फलक, बोर्डकरिता प्रतिचौरस फुटास 111 रुपये दर आकारत आहे. तोच दर कायम ठेवण्यात यावा, प्रतिचौरस फुटासाठी 580 रुपये दर आकारणी अत्यंत चुकीची आणि बेकायदा आहे, अशी मागणी व्यापार्यांनी केली.
तसेच सध्या नामफलक हे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत लिहिण्याचे बंधन आहे. यामुळे 3 फूट बाय 10 फुट रुंद हा आकार लहान पडत आहे. यामुळे आकाराची मर्यादा वाढवावी, अशा विविध मागण्या महासंघाच्या प्रतिनिधींनी केल्या. त्यावर अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार यांनी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. यासंदर्भात एक सविस्तर प्रस्ताव तयार केला जाईल,
आकाशचिन्ह विभागाच्या नियमापेक्षा जास्त आकाराच्या पाट्या लावणार्या आणि त्यावर कंपन्यांची जाहिरात करणार्या दुकानदारांनाच केवळ नोटिसा बजाविण्यात येत आहेत. नियमानुसार पाट्या असलेल्या दुकानांना नोटिसा बजाविण्यात आलेल्या नाहीत.
– माधव जगताप, आकाशचिन्ह विभागप्रमुख
हेही वाचा