पुणे: महापालिकेच्या चार मोठ्या रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन आणि एमआरआय सेवा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कमला नेहरू रुग्णालयासह दोन रुग्णालयांमधील एमआरआय यंत्रणा बंद पडत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत होती. मात्र, सर्व रुग्णालयांमधील सेवा पूर्ववत कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या सुतार रुग्णालय (कोथरूड), कमला नेहरू रुग्णालय (मंगळवार पेठ), राजीव गांधी रुग्णालय (येरवडा) आणि पोटे दवाखाना (पद्मावती) या चार रुग्णालयांमध्ये एक्स रे, सीटी स्कॅन, एमआरआय या तपासण्या उपलब्ध आहेत. केंद्रीय सरकारी आरोग्य योजनेपेक्षा पाच ते दहा टक्के कमी दराने पीपीपी तत्त्वावर या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विविध आजारांच्या अचूक निदानासाठी डॉक्टर गरजेनुसार सिटी स्कॅन अथवा एमआरआय तपासणी करण्याचा सल्ला देतात. खासगी रुग्णालयांमध्ये सिटी स्कॅनसाठी 2 ते 3 हजार रुपये आणि एमआरआय तपासणीसाठी 5 ते 7 हजार रुपये खर्च होतो.
रुग्णांना इतका खर्च करणे बऱ्याचदा परवडण्याजोगे नसते. अशा परिस्थितीत महापालिका रुग्णालयांमध्ये कमी दरांमध्ये उपलब्ध होत असलेल्या तपासण्या रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहेत. मात्र, गरिबांसाठी तपासण्या मोफत उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिकेच्या चार रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय सुविधा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक सेंटरला दररोज अंदाजे 15 ते 20 रुग्णांची तपासणी होते. आधुनिक तंत्रज्ञानाची यंत्रणा असल्याने अचूक निदान करणे शक्य होत आहे.डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका