‘डोअर-टू-डोअर‌’ जाऊन महापालिका करणार कचरासंकलन! Pudhari
पुणे

PMC Garbage Collection: ‘डोअर-टू-डोअर‌’ जाऊन महापालिका करणार कचरासंकलन!

विमाननगर, भवानी पेठेतील प्रयोग यशस्वी : कचरा टाकण्यावर आळा; नागरिकांकडूनही मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

पुणे : घरोघरी निर्माण होणारा कचरा थेट इमारतींच्या तळमजल्यात किंवा सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ गोळा करण्याचा पुणे महानगरपालिकेचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. विमाननगर आणि भवानी पेठ या भागांत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रस्त्यांवरचा कचरा पूर्णपणे गायब झाला असून, हा उपक्रम आता संपूर्ण शहरात राबवण्याचा विचार महापालिकेकडून सुरू आहे.(Latest Pune News)

महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले की, ‌‘या प्रयोगाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा न दिसणे ही मोठी सकारात्मक बदलाची खूण आहे.‌’ यापूर्वी अनेक नागरिकांनी कचरा संकलन शुल्क न भरल्याने रात्री किंवा पहाटे रस्त्यांच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे परिसर अस्वच्छ दिसत होता. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव प्रयोग सुरू करण्यात आला.

विमाननगर आणि भवानी पेठेत गेल्या महिनाभरात या पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. कचरा संकलनासाठी निश्चित मार्ग आखण्यात आले आणि कचरा वेचकांसह घंटागाडीचे वेळापत्रक तयार करण्यात आले. यामुळे कचरा गोळा होऊन तो लगेच वाहून नेला जातो. परिणामी, फिडर पॉइंटवर कचऱ्याचे ढीग तयार होत नाहीत. पूर्वी या भागातील फिडर पॉइंट रस्त्याच्या कडेला असल्याने तो परिसर अस्वच्छ दिसत असे. आता शहरातील फिडर पॉइंटचे उच्चाटन करण्यात आले असून, परिसर स्वच्छ झाला आहे.

कचरा संकलन आणि वाहतूक यामध्ये समन्वय राहावा, म्हणून वाहनांचे ‌‘जीपीएस ट्रॅकिंग‌’ सुरू करण्यात आले आहे. या प्रयोगामुळे कचरावेचक आणि वाहनचालकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आहे. पुढील टप्प्यात वाघोलीसह उर्वरित पुणे शहरात ही योजना राबविण्याची तयारी

महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक साधनसामुग्री आणि नियोजन अंतिम टप्प्यात आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT