पुणे

PMC budget 2024 : ओल्या कचर्‍यापासून होणार वीटनिर्मिती

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने उभारलेल्या व सध्या बंद पडलेल्या बायोगॅस प्रकल्पाच्या जागांवर ओल्या कचर्‍यापासून वीटा (ब्रिकेट्स) तयार करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यासाठी शहरात चार ठिकाणी ब्रिकेट्स तयार करण्याचे प्रकल्प उभारण्याचे नियोजन महापालिकेच्या अंदाजपत्रकात केले आहे. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापनासाठी अंदाजपत्रकामध्ये 922.92 कोटीची तरतूद केली आहे.

शहरात निर्माण होणारा कचरा जिरवण्यासाठी महापालिकेने आंबेगाव, केशवनगर, हडपसर, बिबवेवाडी, बावधन, उरुळी देवाची- फुरसुंगी, रामटेकडी आदी ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प, वर्गीकरण केंद्र, रॅम्प आदी व्यवस्था केली आहे. शहरातील रस्ते मनुष्यबळ आणि मशीनमार्फत करण्यात येतात. याशिवाय महापालिका कर्मचारी आणि स्वच्छ संस्थेचे कर्मचारी यांच्या मार्फत घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्याचे काम केले जाते.

शहरात दैनंदिन निर्माण होणार्‍या कचर्‍याचे संकलन करणे, वाहतूक करणे, प्रक्रिया व शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे व तसेच प्रकल्पांमध्ये निर्माण होणार्‍या रिजेक्ट, देवाची उरुळीतील जुन्या कचर्‍यावर कॅपिंग व बायोमायनिंग दैनंदिन झाडणकाम, दैनंदिन निर्माण होणार्‍या राडारोडा संकलन वाहतूक व प्रक्रिया करणे आदी कामे महापालिकेकडून केली जातात. एकत्रित घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभाग व मोटारवाहन विभागाकडील सर्व वाहने, कचरा प्रकल्प, मनुष्यबळ यांचे संगणकीय एकत्रिकरण करण्याचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. तसेच, दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणेकरिता कमांड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहे.

ओला आणि सुका कचरा वेगवेगळा देण्याचे आवाहन महापालिकेकडून वारंवार केले जाते. सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभे केले आहेत. तसेच, बायोगॅसचेही प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मात्र, यातील काही प्रकल्प बंद असल्याने त्या जागेत ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून विटा तयार करण्याचे चार प्रकल्प उभारण्याचे नियोजन अंदाजपत्रकात केले आहे. कचर्‍यापासून ग्रीन हायड्रोजन निर्मिती करणारा देशातील पहिला प्रकल्प 350 मे. टन क्षमता असलेले रामटेकडी येथे उभारण्याचे नियोजन अंदाजपत्रकात केले आहे. तसेच, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असून हा प्रकल्प 750 मे. टन क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. देवाची उरुळी कचरा डेपो येथील जागेत कार्यरत असलेल्या 350 मे. टन क्षमतेच्या प्रकल्पाची 500 मे. टनापर्यंत क्षमता वाढवण्यासोबतच कात्रज हस्तांतरण केंद्र येथे कचरा हस्तांतरण केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. एकंदरीतच महापालिकेच्या अंदाज पत्रकामध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी 922.92 कोटींची तरतूद केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT