पुणे : शहरातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणविरोधात पुणे महानगरपालिकेने मोठी कारवाई हाती घेतली आहे. बुधवारी (दि. 9) पुण्यातील सारसबागेजवळील प्रसिद्ध खाऊ गल्लीतील सर्व दुकाने चोख पोलिस बंदोबस्तात पाडून टाकण्यात आली. या सोबतच हडपसर परिसरातील हांडेवाडी, सय्यदनगर, म्हाडा कॉलनी, तर औंध परिसरातील अतिक्रमणे बांधकाम विभागाच्या सहकार्याने पाडण्यात आली.
शहरातील अतिक्रमणाविरोधात महानगर पालिकेच्या अतिक्रमण आणि बांधकाम विभागाने आज संयुक्त कारवाई केली. यात दुकाने, पक्की बांधकामे तसेच टपर्या हटवण्यात आल्या. या वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सारस बागेशेजारी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची हॉटेल गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. हे सर्व हॉटेल अनधिकृत असून ती काढण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, येथील दुकानांवर कारवाई होत नव्हती. बुधवारी अखेर मोठ्या पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने येथील दुकाने पाडण्यात आली.
सारसबागेसह हडपसर येथील हांडेवाडी, सय्यदनगर,म्हाडा कॉलनी, येथील बांधकामे व बेकायदेशीर दुकाने देखील पाडण्यात आली. या वेळी मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. येथील बांधकामांना व व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या. मात्र, तरीसुद्धा अतिक्रमणे काढली नसल्याने आज कोणतीही पूर्वसूचना न देता या परिसरात कारवाई करण्यात आली.
सारसबागेजवळील खाद्यपदार्थांच्या चौपाटीसंदर्भात नागरिकांकडून येणार्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा एकदा हातोडा चालवला आहे. अतिक्रमण विभागाने बुधवारी केलेल्या कारवाईत येथील 54 स्टॉल धारकांचे शेड काढून 7 ट्रक टेबल, खुर्च्या व काउंटर असे साहित्य जप्त केले. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे, परिमंडळ पाचचे उपायुक्त सुनील बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अतिक्रमण अधिकारी उमेश नरुले, परिमंडळ क्रमांक 3 व 5 संपूर्ण स्टाफ, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक श्रीकृष्ण सोनार, राजेश खुडे, भिमाजी शिंदे, शशिकांत टाक आदीच्या पथकाने केली. यासाठी पालिका अतिक्रमण विभागाचे 5 पोलिस व 20 महाराष्ट्र सुरक्षा बल जवान, 3 जेसीबी, व 1 गॅस कटरच्या मदतीने करण्यात आली .
पुण्यातील काही पेठा तसेच, औंध बाणेर लिंक रस्ता, मेडिपॉइंट चौक ते विधातेवस्ती चौक आणि बाणेर मुख्य रस्ता येथील सुमारे 31 हजार 200 चौरस फूट क्षेत्रावरील दुकाने, हॉटेल्स, पत्रा शेड व पक्क्या स्वरूपाची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. बांधकाम विकास विभाग झोन 3 यांचेमार्फत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 35 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.
आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनांनुसार शहरातील विविध भागातील अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. ज्यांनी बेकायदेशीर बांधकामे आणि दुकाने थाटली आहेत, अशांना नोटिसा दिल्या असून त्यानंतरही त्यांनी अतिक्रमणे न काढल्याने बुधवारी शहरातील विविध भागात ही कारवाई झाली.संदीप खलाटे, प्रमुख अतिक्रमण विभाग, पुणे महानगरपालिका