बाजार समितीचे मुख्य कार्यालय हटवण्याचा घाट? Pudhari
पुणे

Pune Market Committee: बाजार समितीचे मुख्य कार्यालय हटवण्याचा घाट?

नव्या फुलबाजारातील दोन मजल्यांवर होणार कार्यालय; पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गुलटेकडीतील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड आवारातील नवीन इमारतीच्या मूळ प्रकल्पात बदल करत इमारतीत दोन मजले आणि वाहनतळासाठी एक अतिरिक्त मजला बांधण्यात येत आहे. या ठिकाणी बाजार समितीचे मुख्य कार्यालय हटवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

त्यादृष्टीने कार्यालयासह पार्किंगसाठी हे बांधकाम करण्यात येत असून, नव्या फुलबाजारपुढे ठेवून प्रतीक्षा यादी डावलून परवान्यांची खिरापत वाटणार्‍या संचालक मंडळाने आता बाजार समितीचे मुख्य कार्यालय हटवण्याचा घाट घातला असल्याचे चित्र आहे. (Latest Pune News)

मुख्य बाजार आवाराच्या प्रवेशद्वारानजीक शंभर कोटींपेक्षा जास्त खर्च करून 11 मजली इमारतीमध्ये शीतगृह, सात लिफ्ट, ऑक्शन हॉल, गाळे, व्यापारी संकुल असा सुसज्ज बहुमजली अद्ययावत फूलबाजार उभारण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येकाला पोटमाळ्यासह 250 स्क्वेअर फुटांचा गाळा उपलब्ध होणार आहे.

नवीन फूलबाजारात 141 अडत्यांना गाळे दिले जाणार आहेत. तर गाळ्यासाठी 235 जण प्रतीक्षा यादीत आहेत. मागील नऊ वर्षांपासून फूलबाजाराची प्रतीक्षा असतानाच मध्यंतरीच्या काळात प्रतीक्षा यादी डावलून काही जणांना परवाने दिल्याचे समोर आले होते. आता बाजार समितीचे कार्यालयच हलवण्याचे नियोजन सुरू केल्याने बाजार घटकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

अडत्यांपुढे प्रशासनाचे नियोजन कोलमडले

नवा फूलबाजार अत्याधुनिक व सुखसोयीसुविधांचा असावा, यादृष्टीने बाजार समिती प्रशासनाने नियोजन केले होते. त्यानुसार बांधकामही झाले. मात्र, पाचव्या व सहाव्या मजल्यावर व्यापार करणे गैरसोयीचे ठरेल, असा सूर व्यापारी वर्गामध्ये उमटला.

या वेळी फूलबाजार हा पहिल्या दोन मजल्यावर असावा, अशी मागणी होऊ लागली. त्यानंतर प्रशासनाने पूर्वीचा निर्णय बदलत पहिल्या दोन मजल्यावर गाळ्यांचे नियोजन केले. मुळात फूलबाजाराचे नियोजन करताना अडतदार, कामगारांना विश्वासात घेणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रशासनावर ही वेळ आल्याचे अडत्यांकडून सांगण्यात आले.

अकरा मजले, नऊ वर्षे अन् 116 कोटींचा खर्च

2016 मध्ये भूमिपूजन होऊन फूलबाजाराच्या बांधकामाला सुरुवात झाली. यादरम्यान, वृक्ष प्राधिकरणाची परवानगी, अतिरिक्त उत्खनन प्रकरणामुळे इमारतीच्या कामास विलंब झाला. त्यामध्ये कोरोनाचीही भर पडली. मात्र, त्यानंतर परिस्थिती पूर्ववत होऊनही कामकाजाची गती संथ राहिली. परिणामी, नऊ वर्षांनंतरही फूलबाजार अस्तित्वात आला नाही. फूलबाजारातून बाजार समितीला वर्षाला जवळपास दीड कोटी रुपये सेस मिळतो. नवीन बाजारासाठी झालेला खर्च पाहता तो खर्च निघण्यासाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर बँका तसेच अन्य कार्यालये आणि पाचव्या व सहाव्या मजल्यावर फूलबाजार असे नियोजन केले होते. फूलबाजारात वरील मजल्यावर गेल्यास फूलव्यापारास अडचणी निर्माण होऊन व्यापार होणार नसल्याच्या कारणावरून फूल अडतदारांकडून विरोध करण्यात आला. तर, बँका किंवा अन्य कार्यालये दहाव्या व अकराव्या मजल्यावर कार्यालय घेण्यास इच्छुक नाही. त्यामुळे बाजार समितीचे कार्यालय त्याठिकाणी सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे.
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT