पुणे: शहरात साईबाबा, शंकर महाराज, स्वामी समर्थ, दत्त मंदिरांसह विविध धार्मिक ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंदिरांची सजावट तसेच देवाला फुले वाहण्यासह गुरुजनांना पुष्पभेट देण्याकडे भक्तांसह शिष्यांचा कल दिसून येतो.
त्याअनुषंगाने मंगळवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढल्याचे चित्र दिसून आले. बाजारात आवकही मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, मागणीच्या तुलनेत ती कमी तसेच त्यामध्ये दर्जेदार फुलांचे प्रमाणही कमी असल्याने फुलांच्या भावात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. (Latest Pune News)
येत्या गुरुवारी (दि. 10) गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी, गुरूपूजन केले जाते. तर, कित्येक लोक दर्शनासाठी मंदिरामध्ये जात असतात. या काळात सजावट आणि हार तयार करण्यासाठी लागणार्या फुलांना जास्त मागणी असते. त्याअनुषंगाने शेतकरी माल राखून ठेवतात. त्यानुसार यंदाही मार्केट यार्डातील फूलबाजारात जिल्ह्यासह सातारा, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत आहे.
बाजारात दाखल झालेल्या फुलांची शहर, उपनगरासह परगावाहून आलेल्या खरेदीदारांकडून शुक्रवारी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत होती. परिणामी, बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होऊन उलाढालही चांगली झाली आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 9) याचप्रकारे आवक होऊन दर कायम राहतील अशी शक्यता अडतदार सागर भोसले यांनी वर्तविली.
दर्जेदार फुलांच्या खरेदीकडे कल
जिल्ह्यासह पुणे विभागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे भिजलेल्या आणि दर्जाहीन मालाचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र, ग्राहकांकडून दर्जेदार आणि सुक्या मालाला मागणी आहे. दर्जेदार मालाला अधिक भाव मिळत आहे. घाऊक बाजारासह किरकोळ बाजारातही फुलांचे भाव वाढले आहेत. उद्याही फुलांनी मोठी मागणी असणार असल्याचे व्यापार्यांकडून सांगण्यात येत आहे.
दर्जेदार फुलांचे दर
झेंडू - 60 ते 80 रुपये
शेवंती - 150 ते 200 रुपये
गुलछडी - 150 ते
200 रुपये
जुई - 500 ते 600 रुपये
साधा गुलाब - 30 ते 40 रुपये (गड्डी)
डच गुलाब - 150 ते 160 रुपये (20 नग)
मंदिरांच्या सजावटीसाठी डच गुलाब, कार्नेशियन, जर्बेरा यांसह विविध फुलांची खरेदी करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमा परवा असून सद्य:स्थितीत दर्जेदार व टिकाऊ फुलांची खरेदी केली जात आहे. उद्या झेंडू, शेवंती यांसह उर्वरित फुलांची खरेदी करण्यात येईल. त्यानंतर रात्रीपासून सजावटीच्या कामाला सुरुवात होईल.
- नितीन भोसले, पुष्पसजावटकार