पुणे: ससून रुग्णालयात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पुणे शाखेने गुरुवारपासून संप सुरू केला आहे. संपात सुमारे 340 परिचारिका सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णसेवेववर परिणाम झाला असून कान, नाक, डोळ्यांसह हाडाच्या तसेच लहान मुलांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र रुग्णालयात पाहायला मिळत आहे.
सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये पुणे शाखेनेही सहभाग घेतला आहे. ससून रुग्णालयात 939 परिचारिका कार्यरत असून त्यापैकी 340 म्हणजे निम्म्या परिचारिका कामावर नाहीत. (Latest Pune News)
त्यामुळे बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभागातील उपचारांवरही परिणाम झाला आहे. वेळेवर तपासण्यांसाठी घेऊन न जाणे, जेवण मिळण्यात दिरंगाई, शस्त्रक्रिया अचानक पुढे ढकलल्याने ससूनमध्ये वाढलेला मुक्काम अशा अनेक तक्रारी रुग्ण आणि नातेवाइकांकडून कामावर असलेल्या परिचारिकांकडे केल्या जात आहेत.
परिचारिकांचा तुटवडा जाणवत असल्याने बीएसस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना रुग्णसेवेसाठी रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि सिंबायोसिस या महाविद्यालयांच्या अधिष्ठाता आणि प्रमुखांना मनुष्यबळ पुरवण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. तेथील विद्यार्थी ससूनमध्ये रुजू झाल्यास रुग्णसेवा सुरळीत राहू शकेल, असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
ससून रुग्णालयातील सुमारे 40 टक्के परिचारिका संपावर गेल्या आहेत. रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. ससूनमधील बीएसस्सी नर्सिंगचे विद्यार्थी तसेच इतर महाविद्यालयांतील मनुष्यबळ मिळावे, यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. आपत्कालीन उपचार आणि शस्त्रक्रियांना प्राधान्य दिले जात आहे.- डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय