पुणे

पालखी सोहळ्यासाठी नियोजन करा : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयीसुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी आत्तापासूनच सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, या वर्षी वेळेवर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याचे सांगून पावसाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक सुविधा करण्यात याव्यात. पावसाळा लक्षात घेता स्वच्छता आणि आरोग्याचा परस्परसंबंध असल्याने तात्पुरत्या शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. स्वच्छतेच्या नियोजनासाठी स्वतंत्र नियंत्रण अधिकार्‍यांची नियुक्ती करावी. पालखी सोहळा जगातील सर्वात शिस्तबद्ध असणारा सोहळा आहे. पालखीला टँकरने पाणीपुरवठा होणार्‍या सर्व स्रोतांची तपासणी करावी.

आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची औषधे, दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत वाढ कण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घेऊन याबाबत आदर्श कार्यपद्धती तयार करावी. वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. शहरातील स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी. त्यासाठी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक घेण्यात येईल.

असे असणार नियोजन

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी एक हजार 500, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी एक हजार आणि संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी 200 शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. 140 रुग्णवाहिका आणि 57 रुग्णवाहिका पथक, 112 वैद्यकीय अधिकारी, 336 आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT