Railway Gate Accident Pudhari
पुणे

Railway Gate Accident: पिसुर्टी रेल्वेगेटवर अपघातांचा पाऊस! ओलसर लोहमार्गामुळे दुचाकीस्वारांची घसरगुंडी

पावसात घसरून अनेकजण जखमी; प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी, तात्काळ दुरुस्तीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वाल्हे: पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पुणे-मिरज लोहमार्गावर वाल्हे-नीरा (ता. पुरंदर) दरम्यानच्या पिसुर्टी रेल्वे फाटकातील लोहमार्ग ओलांडणे मागील काही दिवसांपासून दुचाकी, तीनचाकी वाहनास जिकिरीचे बनले आहे. (Latest Pune News)

महामार्गावरील पिसुर्टी रेल्वेगेट मधील लोहमार्ग ओलांडताना अनेक दुचाकीस्वार घसरत आहेत. यामुळे होत असलेल्या अपघातामुळे अनेकजण जायबंदी झाले आहेत. मात्र, यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही उपाययोजना न करण्यात आल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील काही दिवसांपासून पुरंदर तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे. शनिवारी (दि. १) सकाळपासूनच या परिसरात संततधार पाऊस पडत आहे. लोहमार्ग ओलसर झाल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडले.

सायंकाळी दुचाकीवरून चाललेले एकजण लोहमार्गावरून घसरून एसटी बसच्या पुढच्या चाकाखाली जाताना वाचले. यामुळे येथून प्रवास करण्यास नागरिकांना भीती वाटू लागली आहे. याच परिसरात अनेक लहान-मोठे खड्डे पडले असून या ठिकाणी दुचाकी लोहमार्गावर जात असताना महामागपिक्षा जुना लोहमार्ग थोडा उंच तसेच रस्त्यावरील वाहने तिरकी जात असल्याने व लोहमार्गाच्या अगदी जवळच रस्ता खराब झाल्याने, लोहमार्गावरून अनेक दुचाकीस्वार घसरून अपघात होत आहेत. दरम्यान, जुना लोहमार्ग ओलांडत असताना अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याने अनेकांना दुखापत झाली. यामुळे रेल्वे प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत होता. या ठिकाणची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT