पुणे

पिंपरी शहरात जोर‘धार’; रस्त्यावरून पाण्याचे लोट, चेंबर तुंबले

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहर परिसरात शनिवार (दि. 2) पहाटेच्या सुमारास धुवँाधार पाऊस झाला. पहाटे साडेपाचच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली. पावसाला सुरुवात झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच शहर परिसरातील चाळीतील घरांत तसेच सोसायट्या आणि गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सुमारे तीन तास झालेल्या जोराच्या पावसाने नागरिकांची झोप उडवली. शहर परिसरात गेले दोन ते तीन दिवस हवेत उकाडा जाणवत होता. उन्हाळ्याप्रमाणे वातावरण झाल्याने घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते; मात्र शनिवारी पहाटे विजेच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली.

पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, दहा ते पंधरा मिनिटांतच रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. बघता बघता सोसायट्या, वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले. या वेळी घराबाहेर पार्क केलेली वाहने निम्मी अर्धी पाण्यात बुडाल्याचे दृश्य होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहनांना नुकसान होवू नये म्हणून नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी हलविली.

काही इमारतींच्या तळमजल्यावरील घरांतही पाणी शिरले होते. या पाण्यामुळे वस्तुंचे नुकसान होऊ नये म्हणून नागरिकांना वस्तू हलविताना नाकीनऊ आले. सकाळी कामाला जायची घाई असताना पावसाचे साचलेले पाणी काढण्यातच अनेकांचा वेळ गेला. शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, वाल्हेकरवाडी, थेरगाव, रावेत, भोसरी, मोशी तसेच उपनगरात जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.

अनेक ठिकाणी ड्रेनेज तुंबल्याने पावसाच्या पाण्याला वाहून जाण्यास वाट न मिळाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शहरातील अनेक सखल भागात पाण्याचे तळे झाल्याचे दृश्य होते. काही भागांत पालिकेचे कर्मचारी तुंबलेले पाणी काढण्याचे काम करत होते. तर काही ठिकाणी नागरिकांनीच स्वत: पाण्यात उतरून पाण्याबरोबर आलेला गाळ व कचरा काढून पाण्याला वाट करून दिली. सुमारे तीन ते चार तासांनंतर पाणी ओसरले. या वेळी पाण्याबरोबर सर्वत्र मैलामिश्रित पाणी आणि गाळ पसरला होता. सुमारे तीन तासांनंतर पावसाचा जोर ओसरला.

रस्त्यांची लागली वाट

पावसाळ्यापूर्वी डागडुजी केलेले रस्त्यांची शनिवारी झालेल्या पावसाने पुरती वाट लावली. अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरचे बुजविलेले खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. शनिवारी पहाटे झालेल्या पावसामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद चिंचवड येथे झाली आहे. चिंचवडला गेल्या 24 तासांत 84 मिलीमीटर पाऊस झाला असल्याचे हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. चिंचवड येथे सकाळी चापेकर उड्डाण पुलाखालील चौक पूर्ण पाण्याने भरला होता. तसेच चिंचवड लिंक रोडवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. लिंक रोड परिसरातील अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये तसेच दुकानांतही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

पवना धरणातून विसर्ग; नदीकाठच्या रहिवाशांना इशारा

पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यातच पवना धरण 100 टक्के क्षमतेने भरले आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण साठ्यातील अतिरिक्त पाणी वीजनिर्मितीद्वारे पवना नदीमध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी सकाळी साडेनऊपासून 800 क्युसेक विसर्ग करण्यात आला; तसेच दुपारी बारा वाजता त्यामध्ये वाढ करून 1400 क्युसेक विसर्ग करण्यात आला. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्याची शक्यता पूरनियंत्रण कक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सावधानतेचा इशारा म्हणून पवना नदीकाठच्या नागरिकांना नदीपात्रात उतरू नये; तसेच काठावरील पाण्याचे पंप, शेतीची अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.

आयटी परिसरातही शिडकाव

मागील महिन्याभरापासून दांडी मारलेल्या पावसाने अखेर आता पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. आयटीनगरी हिंजवडी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात शुक्रवारपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने बळीराजा समाधानी आहे. शुक्रवारी दुपारी उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. तर शनिवारीदेखील दिवसभर ढगाळ वातावरणामुळे पावसाचे चित्र होते. दरम्यान, काही हलक्या ते मध्यम सरी पडत असल्याने खरीप पिकांसाठी आवश्यक पाऊस पडल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.
या पावसामुळे कासारसाई पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरला असून, शनिवारी दुपारी 1 वाजता 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली होती. यामुळे परिसरातील ओढेदेखील वाहत होते. परिसरात प्रामुख्याने घेतल्या जाणार्‍या भातापिकासदेखील या पावसामुळे अधिकचा फायदा होत आहे. यामुळे पाण्यासाठी इतर स्रोतावर आता शेतकर्‍यांना अवलंबून राहावे लागणार नाही. पावसामुळे मात्र आयटी नगरी, फेज दोन यासह मारुंजी, लक्ष्मी चौक येथील रस्त्यांवर पाण्याचा प्रवाह होता.

लोणावळ्यात शंभर मि. मी. पावसाची नोंद

शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. केवळ तीन ते चार तासांतच या ठिकाणी 100 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस बराच मागे पडला आहे.   पावसाने सर्वत्र ओढ दिली असली तरीही लोणावळा शहरात दिवसातून एकदातरी पाऊस आपली हजेरी लावून जात आहे, पण त्याचे प्रमाण कमी असल्याने पाऊस असूनही नसल्यासारखा आहे.
शुक्रवारचा संपूर्ण दिवस आणि रात्री उशिरापर्यंत पावसाचा एकही थेंब पडला नव्हता. मात्र, मध्यरात्रीनंतर अचानक पाऊस बरसला, यामुळे फारसा फरक पडला नसला तरीही पावसाच्या मोजमापात वाढ झाली आहे. मागील वर्षी 2 ऑगस्टच्या सकाळपर्यंत एकूण 4583 मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला होता. तर, यावर्षी एकूण 3806 मिलिमीटर इतका पाऊस मोजला गेला आहे.
धरणातून विसर्ग करण्यात आला असला तरी तो सामान्य स्वरूपाचा आहे. सध्यातरी नदीकाठच्या नागरिकांना हलविण्याची गरज नाही. तरीदेखील आम्ही सतत पाहणी करून तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत. नागरिकांसाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून शाळांमध्ये सोय करण्यात आली आहे.
– ओमप्रकाश बहिवाल, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
हेही वाचा
SCROLL FOR NEXT