नारायणगाव : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) हद्दीतील खडकमाळ येथील अरुण पोटे यांच्या घराजवळ गुरुवारी (दि. 6) मध्यरात्री 12 ते अडीच वाजण्याच्या दरम्यान तीन बिबटे घराभोवती फिरताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या ठिकाणी वन खात्याने तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे.(Latest Pune News)
पिंपरी पेंढार परिसरात बिबट्यांचा वाढता वावर वाढला असून, अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी या परिसरात दोन महिलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
अरुण पोटे यांनी सांगितले की, ‘आमच्या घराला 3 बिबटे मध्यरात्री घिरट्या घालत होते. परिसरातील पोल्ट्री व कोंबड्यांच्या वासामुळे बिबटे वारंवार येत आहेत, तरी वन विभागाने त्याची दखल घेतली नाही. एखाद्या माणसाचा जीवही जाऊ शकतो.’
पिंपरी पेंढार येथील अरुण पोटे यांच्या घराजवळ पिंजरा लावण्याची व्यवस्था शुक्रवारी (दि. 7) रात्री उशिरा किंवा शनिवारी (दि. 8) सकाळी 11 वाजेपर्यंत पूर्ण होईल. तसेच, रात्रीच्या वेळेला गस्त घालणारी वन विभागाची वाहने त्या भागात फिरवली जातील.