पुणे

Pimpri : अवयव प्रत्यारोपणास प्रोत्साहन देणारी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने सोसायटी ऑफ क्लिनिकल अ‍ॅनाटोमिस्ट्सची 12 वी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेची सुरुवात गुरुवारी (दि. 4) 'अवयव प्रत्यारोपणाचे शारीरिक पैलू' या विषयावरील कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन (सीएमई) या पूर्वपरिषदेने झाली. ही परिषद 6 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या वर्षीच्या परिषदेची मुख्य संकल्पना 'डिसेक्शन हॉल ते ऑपरेशन थिएटरपर्यंत शरीरशास्त्राचा प्रवास,'ही आहे. क्लिनिकल अ‍ॅनाटॉमीचे पुस्तकी शिक्षण ते प्रत्यक्ष शस्त्रक्रियेतील उपयोगापर्यंतच्या प्रवास दर्शवण्याचा उद्दिष्ट यामागे आहे.

या परिषदेत विविध वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व्यावसायिक अवयव प्रत्यारोपणाचे शारीरिक आणि शल्यचिकीत्सक पैलू, पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, शरीरशास्त्रातील थ्रीडी प्रिंटिंग, ब्रेन इमेजिंग यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करतील.
या परिषदेला डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराजदादा पाटील, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे डीन डॉ. जे. एस. भवाळकर, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या शैक्षणिक विभागाच्या संचालक डॉ. पी. वत्सलस्वामी उपस्थित होते.

डॉ. यशराजदादा पाटील म्हणाले, की ही परिषद बुद्धिमत्ता आणि नावीन्यपूर्ण विचारांना एकत्र आणणार आहे. आरोग्यसेवा शिक्षणातील उत्कृष्टतेसाठीच्या आमच्या अतूट वचनबद्धतेचा हा एक उल्लेखनीय पुरावा आहे. वैद्यकीय संशोधन, शस्त्रक्रियेतील नावीन्यपूर्ण पद्धती, शैक्षणिक पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांच्यासाठी ही परिषद एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे, ज्यामुळे आरोग्यसेवा क्षेत्राचे भवितव्य आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांमधील उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रगती याबाबत माहिती मिळणे शक्य होणार आहे.

डॉ. भाग्यश्रीताई पाटील म्हणाल्या, आमच्या संस्थेत हृदय, फुफ्फुस, यकृत, स्वादुपिंड आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे, जी अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञान आणि प्रगत शस्त्रक्रिया साधनांनी सक्षम आहे. अवयव प्रत्यारोपणाबाबत आम्ही आमच्या कार्याला चालना देणार्‍या दात्यांचा नेहमीच सन्मान करतो. यावेळी डॉ. जे. एस. भवाळकर, डॉ. पी. वत्सलस्वामी यांनी मार्गदर्शन केले. तीन दिवस चालणार्‍या या परिषदेत जगभरातील विविध संस्थांमधील वैद्यकीय व्यावसायिक, विद्यार्थी, संशोधक आणि वैद्यकीय तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे केलेले अवयव प्रत्यारोपण

  • किडनी (मूत्रपिंड) प्रत्यारोपण – 186
  • यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण – 60
  • किडनी (मूत्रपिंड) आणि पॅनक्रिया (स्वादुपिंड) प्रत्यारोपण – 3
  • यकृत आणि किडनी प्रत्यारोपण – 2
  • हृदय प्रत्यारोपण – 4
  • फुफ्फुस प्रत्यारोपण – 13
  • हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण – 3
  • नेत्र (कॉर्निया) प्रत्यारोपण -79
  • एकूण अवयव प्रत्यारोपण – 350

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT