पुणे

Pimpri News : अतिक्रमणांवरील कारवाई का थंडावली?

Laxman Dhenge

हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा : येथील लक्ष्मी चौक ते मारुंजी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पीएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राबवलेल्या अतिक्रमण कारवाईची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाददेखील मिळाला. त्यामुळे या रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या अनेकांचे चांगलेच धाबे दणाणले होते. अनेकांनी याचा धसका घेतला होता. तर काही जण याबाबत थेट अधिकारी आणि पोलिसांशीदेखील भिडले. दरम्यान, अतिक्रमणांवर कारवाई कधी होणार? असा सवाल नागरिक करताना दिसत आहेत.

संबंधित कारवाईच्या प्रसंगी काही लोकप्रतिनिधींनी काही कायदेशीर बाबी लक्षात आणून दिल्यानंतर संबंधित अधिकार्‍यांनी दोन दिवसांचा कालावधी देत कारवाई थांबवली. त्यानंतर मात्र मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त देण्यास असमर्थता दर्शवली असल्याने कारवाई थांबवण्यात आली होती; परंतु आता मात्र ही कारवाई का होत नाही? याबाबत अनेक जण विचारणा करत आहेत.

तसेच या कारवाईबाबत अनेकांनी शंका उपस्थित करत केवळ बिल्डर आणि व्यावसायिक यांच्या स्वार्थासाठी ही कारवाई केली गेली असल्याचे आरोप अनेक ग्रामस्थ करत आहेत. तर मारुंजी ते कासारसाई, तसेच पुढील काळात माण येथे होत असलेल्या माणदेवी चौकातील अतिक्रमणाबाबत तत्परता पीएमआरडीए दाखवणार का, असा सवाल आहे. या परिसरातील आजूबाजूला असलेले अतिक्रमण काहींनी स्वतःहून काढले. तर अनेकांनी धास्ती घेतली आहे.

माण-कासारसाईतील अतिक्रमणे गंभीर विषय

माण- कासारसाई रस्ता राज्य महामार्गअंतर्गत समाविष्ट असल्याने यावरील अतिक्रमण हा कायमच गंभीर विषय ठरला आहे. अनेक अपघात या रस्त्यावर होतात, तर काही ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने या रस्त्यावर गतिरोधक आणि खोदाई केल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. नागरिक आणि वाहनचालक यामुळे हैराण झाले आहेत. वाहतूक अतिशय संथगतीने होत असते. लक्ष्मी चौक, मारुंजी चौक येथे नित्याची होणारी वाहतूक कोंडीमुळे आयटी कर्मचारी हैराण होते. त्यास काही प्रमाणात लगाम लागली आहे. मात्र या रस्त्याचे रुंदीकरण आणि भविष्यात असलेल्या समस्यांवर प्रशासन कसे मार्ग काढणार, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT