पुणे

Pimpri News : रोड स्वीपर मशिनसाठी आरटीओचा ग्रीन सिग्नल

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील 18 मीटर व त्यापेक्षा अधिक रूंद रस्त्यांचे यांत्रिक पद्धतीने (रोड स्वीपर मशिन) साफसफाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठ्या व मध्यम आकाराच्या एकूण 16 वाहनांना पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयाने (आरटीओ) परवानगी दिली आहे. त्यामुळे या कामातील मोठा अडसर दूर झाला आहे. लवकरच प्रत्यक्ष रस्ते सफाईस सुरूवात करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाई कामाची निविदा सुरूवातीपासून वादात अडकली आहे. प्रशासकीय राजवटीत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या कामास 27 डिसेंबर 2022 ला स्थायी समितीची मान्यता दिली. शहराच्या चार भागातील या कामासाठी प्रत्येक महिन्यास 45 कोटी खर्च आहे. तर, एकूण 7 वर्षांसाठी एकूण 329 कोटींचा खर्च होणार आहे. संबंधित ठेकेदारांना 30 जूनला वर्कऑर्डर दिली आहे. मोठे व मध्यम आकाराचे परदेशी बनावटीचे अत्याधुनिक रोड स्वीपर मशिन वाहने खरेदी करण्यासाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, परदेशातून वाहने आणण्यास विलंब झाला.

त्यानंतर आरटीओकडून परवाना मिळण्यास अधिक काळ गेला. अखेर, मोठ्या आकाराची 8 व मध्यम आकाराची 8 अशा सर्व 16 वाहनांना आरटीओने परवानगी दिली आहे. त्यामुळे या कामातील अडथळे दूर झाले आहेत. लवकरच प्रत्यक्ष रस्ते सफाई कामास सुरूवात करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. पंधरा ऑगस्ट, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असे अनेक मुहूर्त सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप काम सुरू न झाल्याने शहरात उलटसुलट चर्चा रंगली आहे. दरम्यान, एका बड्या नेत्यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्याचे महापालिका प्रशासनाने निश्चित केले आहे. त्याची तारीख मिळत असल्याने काम सुरू केले जात नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

आयुक्त दौर्‍यावरून आल्यानंतर निर्णय

रोड स्वीपर मशिनचे मोठी व मध्यम अशी एकूण 16 वाहनांना आरटीओने परवानगी दिली आहे. ही सर्व परदेशी बनावटीची अत्याधुनिक वाहने आहेत. आयुक्त शेखर सिंह हे परदेश दौर्‍यावर आहेत. ते आल्यानंतर काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT