पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यापूर्वी मतदानापासून वंचित राहिलेल्या दिव्यांग मतदारांसाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे मतदार नाव नोंदणीसाठी विशेष मोहीम रविवारी (दि.3) घेण्यात आली. त्यात पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदार संघातून एकूण 108 दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आली.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिकेने प्रा. मोरे प्रेक्षागृहात दिव्यांगांचा मेळावा आयोजित केला होता. त्या ठिकाणी तीनही मतदार संघाचे दिव्यांग मतदार नावनोंदणीचे स्टॉल उभारण्यात आले होते. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिव्यांग मतदारांकडून अर्ज भरून घेण्यात आले. एक जानेवारी 2024 ला 18 वर्षे पूर्ण झालेल्या दिव्यांग मतदारांची नावनोंदणी करण्यात आली.
चिंचवड विधानसभा मतदार संघात एकूण 18 जणांनी अर्ज भरले. पिंपरी मतदारसंघात 12 जणांनी अर्ज भरून दिले. तर, सर्वांधिक 78 अर्ज भोसरी मतदारसंघात भरण्यात आले. त्यात ओटा स्किम व घरकुल येथील 39, चर्होली येथील 20 आणि बालाजीनगर येथील 19 अर्ज आहेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे घेण्यात आली.
नावनोंदणीसाठी दिव्यांग प्रमाणपत्र व रहिवाशी पुरावे जोडणे आवश्यक आहे. शहरातील पात्र दिव्यांग नागरिकांनी चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय इमारतीमधील मतदार नोंदणी कार्यालयात अर्ज जमा करावेत, असे मतदार नोंदणी अधिकारी तथा कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले. तर, भोसरी मतदारसंघासाठी अण्णासाहेब मगर स्टेडिमयसमोरील इमारतीतील कार्यालयात आणि पिंपरी मतदार संघातील अर्ज प्राधिकरण, निगडी येथील डॉ. हेडगेवार भवन कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा