Pimpri News : स्वस्त धान्य दुकानांतील ‘ई-पॉस’ची कासवगती

Pimpri News : स्वस्त धान्य दुकानांतील ‘ई-पॉस’ची कासवगती

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य वितरणासाठी बसविण्यात आलेले ई-पॉस मशीन कासवगतीने सुरू आहे. परिणामी, धान्य वाटपाचे काम संथगतीने सुरू असते. यामुळे स्वस्त धान्य दुकानदार हैराण झाले असून, त्यातच भरीस भर म्हणून सर्व्हर डाऊननेही काहीवेळा अडथळा जाणवतो. अन्नधान्य वितरण आणि पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशिन देण्यात आले आहेत.

नागरिकांना हक्काचे पुरेसे धान्य मिळावे, धान्य वाटपातील काळाबाजार रोखता यावा, यासाठी शासनाने ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे. या प्रक्रियेत प्रत्येक कुटुंबाच्या सदस्य संख्येची नोंद करून धान्याचे वितरण सुरू करण्यात आले. मात्र, स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आलेले ई-पॉस मशिन संथगतीने चालत असल्याने नागरिकांचा वेळ वाया जात असून, धान्य वितरणातही अडचणी येत आहेत.

संथगतीमुळे धान्य वाटपात त्रुटी

स्वस्त धान्य दुकानांमध्ये बसविलेल्या ई-पॉस मशीनला 2-जीची गती असल्याने धान्य वितरण संथगतीने सुरू आहे. म्हणून मशिनच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याची गरज आहे. 4 जीस अनुकूल सॉफ्टवेअर देण्याची मागणी करूनही शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी नागरिकांच्या अंगठ्याचा ठसा, माहिती अद्ययावत करणे आदींमध्ये अडथळे येत आहेत. काही नागरिकांना शिधा मिळत नाही तर, काही नागरिकांना शिधा मिळण्यास विलंब होत आहे. शासनाने या मशिनचा स्पीड 5 जी करावा, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत आहे.

नागरिकांना होतोय नाहक त्रास

ई-पॉस मशीनचा वापर करताना काहीवेळा सर्व्हर डाऊनचीही समस्या येते. त्यामुळे नागरिकांना दोन ते तीन तास नाहक थांबावे लागते तर, काही वेळा धान्य न घेता रिकाम्या हाताने माघारी घरी परतावे लागते.

स्वस्त धान्य दुकानांमध्ये बसविलेल्या ई-पॉस मशिनला टूजीचा स्पीड आहे. तसेच, सर्व्हर डाऊनची समस्या देखील जाणवत असते. मशीनला 5 जी चा स्पीड मिळावा, अशी मागणी केलेली आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी 11 डिसेंबरला नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे.

– विजय गुप्ता, खजिनदार,
ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकिपर्स फेडरेशन.

ई-पॉस मशीनला सध्या 2 जीचा स्पीड असल्याने पावती निघत नाही. काही वेळा सर्व्हर डाऊनची समस्या देखील जाणवते. त्यामुळे नागरिकांना धान्य न घेता देखील काही वेळा घरी परतावे लागते. हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.

– विक्रम छाजेड, स्वस्त धान्य दुकानदार.

स्वस्त धान्य दुकानांसाठी 5 जी ई-पॉस मशिन उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सध्या शासन स्तरावर सुरू आहे. जानेवारी महिन्यात या मशिन्स धान्य दुकानदारांना दिल्या जातील, असे अपेक्षित आहे. सध्या सर्व्हर डाऊनची समस्या कमी झाली आहे. तसेच, काही दुकानदार वायफाय यंत्रणेचा वापर करत असल्याने मशिनला गती येत आहे.

– गजानन देशमुख, फ परिमंडळ अधिकारी,

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news