पुणे

Pimpri News : नाव साधर्म्याचा फटका

Laxman Dhenge

पिंपरी : नावात काय आहे…!, असे शेक्सपीयरचे म्हणणे असले तरीही सर्वसामान्यांना आपल्या नावामुळे अनेकदा फायदे तसेच तोटेही होत असतात. यातील एक तोटा म्हणजे गुन्हेगारांशी असलेले नाम साधर्म्य. पिंपरी-चिंचवडमध्ये मागील दहा महिन्यांत तब्बल साडेतीनशे जणांना पासपोर्ट काढताना नाम साधर्म्याचा फटका बसल्याची नोंद आहे. त्यामुळे नावात बरंच काही आहे, अशा भावना संबंधित अर्जदारांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

उद्योग, व्यवसाय आणि शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवडकरदेखील आघाडीवर आहेत. शहरातून पहिल्यांदाच विमान प्रवास करणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेकडून 'व्हेरिफिकेशनचे' काम युद्धपातळीवर सुरू असते. पासपोर्ट देण्याच्या प्रक्रियेत पोलिस व्हेरिफिकेशन महत्त्वाचे मानले जाते. पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर पासपोर्ट विभागाकडून स्थानिक पोलिसांकडे पाठविला जातो.

त्यानुसार, स्थानिक पोलिस अर्जदाराशी संपर्क साधून पडताळणीची प्रक्रिया करतात. पत्ता, नाव, तसेच इतर कागदपत्रांची तपासणी होते; तसेच अर्जदाराच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत का, असल्यास गुन्ह्यांचे स्वरुप आदी माहिती घेतली जाते. यामध्ये अनकेदा नाम साधर्म्यामुळे अर्जदारांची ससेहोलपट होते. पिंपरी- चिंचवडमध्ये मागील दहा महिन्यांत साडेतीनशेजणांचे री- व्हेरिफिकेशन करण्यात आल्याची नोंद आहे. पोलिस आयुक्तालयातून अर्जदारावर गुन्हे दाखल आहेत का, याची तपासणी केली जाते. गुन्ह्याची नोंद असल्याचे ऑनलाईन तपासणीतून पुढे आल्यानंतर संबंधित अर्जदारास याबाबत खुलासा विचारून पुढील प्रक्रिया केली जाते. यामध्ये अर्जदाराला तो मी नव्हेच हे पटवून देताना मोठी डोकेदुखी होते.

प्रत्येक पोलिस ठाण्यात पडताळणी विभाग

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत 18 पोलिस ठाणे असून, प्रत्येक ठाण्यात पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी स्वतंत्र विभाग आहे. या विभागातील कर्मचारी दररोज पडताळणीच्या अर्जदारांची माहिती संकलित करतात. ती माहिती आयुक्तालयातील पडताळणी विभागाकडे पाठवतात. तेथे पुन्हा पडताळणी होऊन त्याचा अहवाल पासपोर्ट कार्यालयाकडे सादर केला जातो.

दहा दिवसांत पडताळणी करण्याचा प्रयत्न

पासपोर्ट कार्यालयाकडून आलेल्या अर्जानुसार पासपोर्ट व्हेरिफिकेशन 21 दिवसांत करावे लागते. त्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्याकडून 15 दिवसांत पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर आयुक्तालय स्तरावरील पडताळणी विभागाकडून ही प्रक्रिया पूर्ण करून 21 दिवसांत अहवाल सादर होतो. ही प्रक्रिया कमीतकमी कालवधीत पूर्ण करून केवळ दहा दिवसांत पडताळणी पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो; मात्र नावातील साधर्म्यामुळे पडताळणीसाठी वेळ जातो.

…अशी होते फेर पडताळणी

पोलिस आयुक्त कार्यालयातून संबंधित अर्जदाराचे प्रकरण फेर पडताळणीसाठी स्थानिक पोलिस ठाण्याकडे पाठवले जाते. त्यानुसार, स्थानिक पोलिस अर्जदार आणि त्याच नावाचा गुन्हेगार यांच्यातील नावाव्यतिरिक्त मूळ गाव, उंची, रंग, जात, अंगावरील खुणा, अशा 32 प्रकारची माहिती पडताळून पाहतात. त्यानंतर संबंधित अर्जदाराचा पडताळणी अहवाल आयुक्त कार्यालयात पाठवला जातो. या अहवालावरून पासपोर्टसाठीचा व्हेरिफिकेशन रिपोर्ट दिला जातो.

अर्जदारावर गुन्हे दाखल आहेत किंवा नाही, याची तपासणी होते. गुन्हा दाखल असल्यास पासपोर्ट विभागाला माहिती कळविली जाते. तसेच, अर्जदारास स्थानिक पोलिसांशी संपर्क करण्यासाठी सूचित केले जाते. त्यानंतर स्थानिक पोलिस पुन्हा पडताळणी करतात. ही प्रक्रिया कमीत-कमी कालावधीत करण्यावर आमचा भर आहे.

– नितीन लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पडताळणी विभाग

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT