पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : निगडी येथे सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी जय ट्रेडर्ससमोर पादचारी भुयारी मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामामुळे निर्माण केलेल्या अडथळे व स्पीडब्रेकरमुळे वारंवार अपघात होत आहेत. हा भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला असून, त्यावर छत बसविण्याचे काम सुरू आहे. भुयारी मार्गाचे काम ठेकेदाराकडून सुरू आहे. त्याची 15 महिन्यांची मुदत 8 जून 2023 ला संपली आहे. मुदत संपल्यानंतरही काम सुरूच आहे. सध्या 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूने मार्ग बंद करून काम करण्यास परवानगी न दिल्याने या कामास विलंब झाला आहे.
त्यामुळे 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्या मुदतीमध्ये म्हणजे 8 सप्टेंबर 2023 पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. त्या मुदतीमध्येही काम पूर्ण झालेले नाही. त्या पुढे 9 सप्टेंबर ते 8 डिसेंबर या 3 महिन्यांच्या मुदतवाढीत दररोज 2 हजार रुपयांचा दंड ठेकेदाराला करण्यात येत आहे. भुयारी मार्गाचे आरसीसीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मार्ग नागरिकांसाठी खुला केला आहे. तेथे टाईल्स बसवून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच, मार्गावर छत लावण्यात येत आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी निगडी येथे भुयारी पादचारी पुलाचे काम करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी वेळेत परवानगी न दिल्याने या कामास विलंब झाला. त्यात बराच कालावधी गेला. एकाच मार्गावर काम करण्यास परवानगी दिल्याने काम संथगतीने झाले. ठेकेदाराला एकूण 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. सध्या ठेकेदाराला दररोज 2 हजार रुपये दंड करण्यात येत आहे. तसेच, त्याला भाववाढीही दिली जाणार आहे. 8 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.
हेही वाचा