पुणे

Pimpri News : वैयक्तिक तक्रारी कमी, सामूहिकच जास्त

Laxman Dhenge

नवी सांगवी : महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयात दिवाळीच्या सणासुदीमुळे तब्बल अठ्ठावीस दिवसांनी जनसंवाद सभा पार पडली. यामध्ये वैयक्तिक तक्रारी कमी, सामूहिक तक्रारी जास्त असल्याचे दिसून आले. प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार येथील क्षेत्रीय कार्यालयात करण्यात येते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुसर्‍या सोमवारच्या ऐवजी तिसर्‍या सोमवारी ही सभा पार पडली.

नुकत्याच पार पडलेल्या जनसंवाद सभेत वैयक्तिक तक्रारी कमी आणि सार्वजनिक तक्रारी सर्वांधिक असल्याचे दिसून आले. कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी या भागातील तेच ते चेहरे येत असून प्रभागातील समस्या मुख्य समन्वय अधिकार्‍यांच्या समोर मांडत असल्याचे दिसून आले.

राजकीय कार्यकर्ते तक्रार करण्यात आघाडीवर

एकाच पार्टीचे कार्यकर्ते लेटर हेडवर घेऊन येत जनसंवाद सभेत अनेक तक्रारी मांडत होते. या तक्रारी वैयक्तिक नसून सार्वजनिक होत्या. त्यामुळे वैयक्तिक तक्रारी घेऊन येणार्‍यास वीस ते पंचवीस मिनिटे ताटकळत बाहेर प्रतीक्षेत उभे रहावे लागत होते. नेमकी जनसंवाद सभा ही प्रभागातील नागरिकांच्या तक्रारीसाठी आहे की राजकीय पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आहे, असा सवाल विचारला जात आहे.

नागरिकांनी जनसंवाद सभेचा उपयोग करून घेतला पाहिजे. वैयक्तिक समस्या मांडण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे. सामूहिक स्वरूपाच्या तक्रारी कोणी करीत असतील, तर यापूर्वी त्यांना सांगितले होते की, अशा स्वरूपाच्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. इतर वेळेमध्ये त्यांनी क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकार्‍यांशी तक्रारी करू शकता.

– अजय चारठणकर, मुख्य समन्वय अधिकारी

12 तक्रारी दाखल

मुळात जनसंवाद सभा ही प्रभागातील नागरिकांच्या अडचणी, तक्रारी, सूचना यांची नोंद त्याचे त्वरित निरसन करण्यात यावे, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. सार्वजनिक तक्रारी घेऊन येणार्‍यांमुळे बाहेर प्रतीक्षेत असलेल्या तक्रारदाराला ताटकळत बसावे लागत आहे. सोमवारी जनसंवाद सभेत येथील ह क्षेत्रीय कार्यालयात एकूण 12 तक्रार आल्या होत्या.

या वेळी मुख्य समन्वय अधिकारी अजय चारठणकर, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, विद्युत कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ, स्मार्ट सिटी तथा पाणीपुरवठा अभियंता चंद्रकांत मोरे, स्थापत्य कनिष्ठ अभियंता जयकुमार गुजर आदी विभागाचे संबंधित अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. तक्रारींमध्ये ड्रेनेज लाईन, स्टॉर्म वॉटर लाईन, क्रीडा, उद्यान, अतिक्रमण, स्थापत्य विभागातील तक्रारी समजून घेत मुख्य समन्वय अधिकारी यांनी संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून तकरींचे निरसन करण्यात आले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT