पुणे

Pimpri News : घरगुती गॅसचा काळाबाजार; तिघांना अटक

अमृता चौगुले

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री करणार्‍या तिघांना गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शरद काशिनाथ पाटील (24, रा. रुपीनगर, तळवडे), सुशांत तानाजी घाडगे (43, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), अर्जुन रामचंद्र नरळे (40, रा. रुपीनगर, तळवडे. मूळ रा. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम निगडी आणि दत्तवाडी आकुर्डी भागात गॅस सिलिंडरचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली.

त्यानुसार, पोलिसांनी सूर्या गॅस सर्व्हिस, गणेश कामगार नगर, दत्तवाडी आकुर्डी आणि क्रिष्णा गॅस सर्व्हिस, आझाद चौक, ओटास्कीम निगडी या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली. गॅस रिफिलिंग करणार्‍या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली.
सुशांत घाडगे हा सरस्वती गॅस एजन्सी, संभाजीनगर येथे सिलिंडर वाहतूक करणार्‍या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. ग्राहकांनी बुक केलेले सिलिंडर त्यांना न देता ते सूर्या गॅस सर्व्हिस, दत्तवाडी, आकुर्डी येथील शरद पाटील याला विकत होता. शरद पाटील हा लहान टाक्यांमध्ये गॅस रिफील करून त्याची विक्री करीत होता. तसेच, क्रिष्णा गॅस सर्व्हिस ओटास्कीम निगडी येथे अर्जुन रामचंद्र नरळे हा देखील लहान टाक्यांमध्ये गॅस रिफील करून त्याची विक्री करीत होता.

पोलिसांनी आरोपींकडून घरगुती वापराचे गॅस सिलिंडर, लहान सिलिंडर, रीफिलर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT