पुणे

Pimpri News : दबक्या पावलांनी आला अन् जेरबंद झाला !

Laxman Dhenge
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात बर्याच वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे. मात्र, शहराचा विकास जसजसा होतो. तसे त्याची दिशाभूल होते. बर्याचदा तो रस्ता चुकतो आणि मनुष्यवस्तीत येतो. कारण काही वर्षांपूर्वी त्याने याठिकाणी हिरवीगार झाडेझुडपे असलेली जागा पाहिलेली असते. मात्र, विकसित जागा पाहिल्यानंतर बिबट्याचादेखील गोंधळ उडतो. बहुतांश वेळा बिबट्या पाच ते सहा दिवस त्या परिसरात फिरतो आणि मग निघून जातो.

उसाच्या शेतात  बिबट्याचा जास्त वावर

बिबट्या शहरात का दिसतो, याबाबत शुभम पांडे यांनी सांगितले, की बिबट्या आपल्याकडे नवीन नाही, मात्र त्यांची संख्या कमी झाली आहे. अजूनही ज्याठिकाणी हरितपट्टा व उसाची शेती आहे त्याठिकाणी बिबटे आढळतात. उसाची शेती असलेली जागा बिबट्याला फार आवडते. ही जागा त्याच्या प्रजननासाठी अनुकूल असते. विनीच्या काळामध्ये बर्‍याचदा नर व मादी बिबट्या एकत्र दिसतात.

सावज समोर, पण त्याने शिकार टाळली

चिखलीमधील मोरे यांच्या घराच्या अंगणात असलेल्या दोन गाय, एक बैल आणि वासरू अशा चार गुरे बांधलेली बिबट्याच्या समोर होती. मात्र, बिबट्याने सावज समोर असतानाही शिकार टाळली. बिबट्याने काहीच इजा न करता, गोठ्यात जाऊन बसला.

बिबट्याच्या पावलांचा घेतला मागोवा

अन्नाच्या शोधात बिबट्या चिखली भागात शिरला. याचा व्हिडीओ काढून मॉर्निंग वॉकला गेलेल्या स्थानिकांनी पोलिसांना कळविले. रेस्क्यू टीम, वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचले. त्याच्या पावलांचा मागोवा घेत, रेस्क्यू टीमने बिबट्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. पुढे तो जीव वाचविण्यासाठी चिखली गावठानातून रामदासनगर-दुर्गानगर परिसरातील अशोक मोरे यांच्या अंगणातील गोठ्यात शिरला. त्या ठिकाणी निशाना (डार्ट) भुलीचे इंजेक्शन देताना अडचणी येत होत्या. शेतातील ज्वारीच्या पिकात गाडीवरून बिबट्याचा शोध घेणे सुरू होते. जेसीबीचादेखील वापर करण्यात आला. मात्र निशाना घेता येत नसल्याने सर्वांच्या नाकीनऊ आले होते.

अग्निशमन विभागाच्या  ब्रांटो वाहनाची मदत

महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ब्रांटो वाहनावरील असलेल्या 55 मीटर (15) मजल्यापर्यंत) सिडीवरील केजच्या सहाय्याने ज्वारीच्या शेतात दडलेल्या वाघाचा शोध घेता आला. त्यामुळे बिबट्याच्या पायाच्या मागच्या भागाला वनविभागाचे अधिकारी चेतन वंजारी यांनी अचूक निशाना साधत डार्ट दिला. पंधरा ते वीस मिनिटांनी

बिबट्या बेशुध्द होऊन, जेरबंद झाला.

आपल्याकडे बिबटे फारसे हल्ले करत नाहीत; कारण मुळात ते फार घाबरतात. बिबट्या हा प्राणी घाबरट आहे तो सहसा हल्ला करत नाही. पण व्यक्ती एकटा असेल तर कदाचित तो हल्ला करतो. माणसाची गर्दी असेल तर तो हल्ला करत नाही. बिबट्या मनुष्यवस्तीत आल्यानंतर ज्या ठिकाणी भटकी कुत्री असतील त्याठिकाणी तो येतो. कारण त्याला कुत्रे खाणे आवडते. देहूरोड, मुळशी, मावळ, कासारसाई या परिसरात बिबट्याचा वावर आहे. तर, पाचाणे व पुसाणे याठिकाणी बिबट्याचा अधिवास आहे. वीसपूर्वी निगडीपर्यंत बिबट्या दिसत होते. दुर्गादेवी टेकडीवरदेखील बिबट्या पकडले आहेत. आपल्याला वाटते की बिबट्या मनुष्यवस्तीत आला आहे. पण ते तसे नाही तो त्याच्या जागी बरोबर असतो. मानवाने त्याठिकाणी अतिक्रमण केलेले असते.

ड्रोनच्या मदतीने बिबट्याच्या  हालचालींचा घेतला वेध

ज्या ठिकाणी नजर पोहोचणार नाही त्या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेता आला. ज्या दिशेने बिबट्या गेला त्या ठिकाणी दोन ते तीन तास ड्रोनद्वारे बिबट्याच्या हालचालींचा वेध घेतला जात होता. त्यानुसार, बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
आमच्या घराच्या अंगणात पहाटे बिबट्याचे दर्शन घडले. कुणाला इजा न करता तो दारातून शेजारी असलेल्या शेतात पळून गेला. दारात असलेल्या गुराढोरांना कुठलीच इजा त्याने केली नाही.
– गणेश मोरे, चिखली रहिवाशी
बिबट्याला डार्ट देताना तो नाजूक ठिकाणांऐवजी मांडीला किंवा शरीराच्या ताठर भागाला द्यावा लागतो. मात्र, बिबट्या शेतात शिरल्याने झाडाच्या पानाफांद्याचा अडथळा येत होता. त्यामुळे डार्टसाठी वेळ जास्त लागत होता. मात्र, अग्निशमन विभागाच्या यंत्रणेचा वापर करत योग्य डार्ट देऊन बिबट्याला बेशुध्द करण्यात आले.
– नचिकेत उत्पात, संचालक, रेस्क्यू टीम
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT