पुणे

Pimpri News : अंगणवाडी सेविकांचा संप; शहरातील अंगणवाड्या बंद

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. अंगणवाडी कर्मचारी संघटनांमार्फत पिंपरी- चिंचवड येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत येणार्या सर्वच अंगणवाड्या सोमवार (दि. 4) बंद ठेवण्यात आल्या होत्या.
अंगणवाडी कर्मचार्यांचे राज्य पातळीवरील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

सेविकांना देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याचाही आरोप या वेळी आंदोलनकर्त्यांनी केला. गेल्या पाच वर्षांत मानधनामध्ये वाढ केलेली नाही; ती करण्यात यावी, पटसंख्या कमी असल्याच्या नावाखाली अंगणवाड्या बंद करण्याचा शासनाचा विचार मागे घ्यायला लावणे, पोषण ट्रॅकर अ‍ॅप मराठीत देणे, मदतनीस, सेविका व मुख्य सेविकांच्या रिक्त जागा भरणे, पदोन्नतीला प्राधान्य देणे, दिवाळीला तुटपुंजी भाऊबीज न देता एका महिन्याच्या मानधनाइतका बोनस देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी हा बंद पाळण्यात येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. शासनाकडे अनेकदा निवेदने दिली. आंदोलने केली, तरीही शासनाला जाग येत नाही. शासनाला जाग यावी म्हणून आम्ही आंदोलन करीत आहोत, अशी खंत अंगणवाडी सेविका व्यक्त करत आहेत.

आशा वर्करना मानधन वाढ, पण अंगणवाडी सेविकांना नाही

आमच्यानंतर काम सुरू केलेल्या आशा वर्कर यांना शासनाने मानधन वाढ दिली; मात्र गेल्या 40 वर्षांपासून आमच्यातील अंगणवाडी सेविका कष्ट करत आहेत, पण आम्हाला मानधन वाढ दिली नाही. तसेच सात ते आठ महिन्यांपासून अंगणवाड्यांचे भाडेदेखील थकले आहे. कुपोषण टाळण्यासाठी दिल्या जाणार्या आहारातदेखील दुजाभाव केला जात आहे. शहरातील काही ठिकाणी बालकांना किराणा दिला जातो; तर काही ठिकाणी सुकडी दिली जाते. ही सुकडी निकृष्ट दर्जाची असते की पालक ते फेकून देतात, अशी प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली.

 हेही वाचा

SCROLL FOR NEXT