पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेची आठही रुग्णालये समाविष्ट करण्यात आली आहेत. तीन वेगवेगळ्या गटांमध्ये या रुग्णालयांचा समावेश केला आहे. त्यानुसार, संबंधित रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमात प्रसुतीविषयक मुलभूत काळजी (सुमन बेसीक) या गटामध्ये पिंपरीतील जिजामाता रुग्णालय, आकुर्डी रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, सांगवी रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालय यांचा समावेश केला आहे.
तर, मूलभूत तातडीची प्रसूतीविषयक काळजी (बी मॉक) या प्रकारात नवीन भोसरी रुग्णालय आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (तालेरा रुग्णालय) यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, व्यापक तातडीची प्रसूतीविषयक काळजी (सी मॉक) या प्रकारात महापालिकेच्या पिंपरी- संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे.
- बाळ जन्मल्यापासून पुढील महिनाभराच्या कालावधीसाठी लागणारी वैद्यकीय सेवा मोफत
- बाळाचे सर्व लसीकरण मोफत केले जाते.
- महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयात आणताना आणि घरी सोडताना मोफत अॅम्ब्युलन्स सेवा
- रुग्णालयामध्ये नॉर्मल प्रसुतीसाठी 3 दिवस तर, शस्त्रक्रियेद्वारे झालेल्या प्रसुतीसाठी (सिझेरियन डिलिव्हरी) 7 दिवसापर्यंत महिलांना अन्न मोफत दिले जाते.
- महिलांच्या प्रसुतीनंतर पुढील 42 दिवसांपर्यंत आशा वर्कर माहिती घेत राहतात.
- महिलांना जननी शिशु सुरक्षा योजनेचे देखील फायदे मिळतात.
सर्व सेवा बंधनकारक आणि मोफत
- सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमात सर्व गरोदर माता, सहा महिन्यापर्यंतच्या स्तनदा माता तसेच सर्व आजारी बालके यांचा समावेश केला आहे. माता व बालकांना 9 गुणात्मक सेवा उपलब्ध करून देण्याची हमी या कार्यक्रमात देण्यात आली आहे. तसेच, या कार्यक्रमांतर्गत सर्व सेवा बंधनकारक आणि मोफत देण्यात येणार आहे.
- या कार्यक्रमात 2020-21 या आर्थिक वर्षासाठी राज्यातील एकूण 196 आरोग्य संस्था, 2022-23 या वर्षासाठी एकूण 471 आरोग्य संस्था तर, 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आणखी 600 आरोग्य संस्था निवडण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या आठही रुग्णालयांमध्ये सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम राबविला जात आहे. विविध विभागांमध्ये ही रुग्णालये समाविष्ट केली आहे. या कार्यक्रमातंर्गत महापालिका रुग्णालयांमध्ये प्रसुतीसाठी दाखल माता आणि प्रसुतीनंतर जन्मलेल्या बाळाची काळजी घेतली जात आहे.
– डॉ. अंजली ढोणे,
सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.