पुणे

Pimpri News : संपूर्ण मिळकतकर भरल्यास 5 टक्के सवलत

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील मिळकतींच्या ड्रोनद्वारे सर्वेक्षणात आतापर्यंत तब्बल दोन लाख मिळकती नोंद नसलेल्या आढळून आल्या आहेत. या मिळकतधारकांनी बिल तयार झाल्यापासून तीन महिन्यांऐवजी एका महिन्याच्या आत मिळकतकराचे संपूर्ण बिल भरल्यास त्यांना 5 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची मंगळवारी (दि.6) मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने हे सर्वेक्षण सुरू आहे. त्यात निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र व मोकळ्या जमिनी अशा नोंद नसलेल्या तब्बल 2 लाख मिळकती आढळून आल्या आहेत. नियमानुसार पहिल्या तिमाहीत म्हणजे 30 जूनपर्यंत संपूर्ण बिल भरल्यास महापालिकेकडून 5 टक्के सवलत देण्यात येते. ही सवलत नोंद असलेल्या व प्रथमच नोंद झालेल्या मिळकतींना देण्यात येते.
मात्र, सर्वेक्षणात आढळून आलेल्या या मिळकती 3 ते 6 वर्षांपूर्वीच्या आहेत. या मिळकतधारकांना तीन महिन्यांसाठी 5 टक्के सलवत देणे योग्य ठरणार नाही, असे करसंकलन विभागाचे मत आहे.

अशा मिळकतधारकांना 20 ऑक्टोबर 2022 च्या परिपत्रकानुसार नवीन मिळकतधारकांना देण्यात येणार्‍या तीन महिन्यांच्या सवलतीऐवजी महिनाभराची सवलत योजनेचा लाभ द्यावा, असा करसंकलन विभागाचा प्रस्ताव आहे. बिल जनरेट झाल्यापासून एक महिन्याचा कालावधी धरला जाणार आहे. त्या महिन्याभरात संपूर्ण बिल भरल्यास त्या मिळकतधारकांना 5 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्या प्रस्तावाला आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्वेक्षणात आढळून आलेल्या मिळकतधारकांना केवळ एका महिन्याची सवलत मिळणार आहे. या माध्यमातून महापालिका तिजोरीत कोट्यवधींचा महसूल जमा होणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT