पुणे

Pimpri : राष्ट्रवादीकडून बूथनुसार मतदार यादीवर लक्ष

Laxman Dhenge
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी, चिंचवड आणि शिरूर लोकसभेतील भोसरी अशा विधानसभानिहाय मतदार यादीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यासाठी विभागप्रमुख, केंद्रप्रमुख आणि बूथप्रमुख कामाला लागले आहेत. मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा जोश व उत्साह वाढला आहे. विभागप्रमुख, केंद्रप्रमुख आणि बूथप्रमुख यांचा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा होणार आहे.
त्यासाठी प्रत्येक जण मतदार यादीवर बारीक लक्ष ठेवून काम करीत आहे. पक्षाकडून मिळालेल्या जबादारीनुसार ते कामात व्यस्त झाले आहेत. शहरातील पक्षाचे पदाधिकारी व बूथप्रमुख निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. भोसरी विधानसभेचे 464 बुथ, पिंपरी विधानसभेचे 399 बुथ आणि चिंचवड विधानसभेच्या 528 बूथचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण केले आहे. येणार्या काही दिवसात तिन्ही विधानसभेची वेगवेगळी बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची यादी बूथनिहाय फोडण्यात आली आहे. प्रत्येक केंद्र व बूथसाठी जबाबदार कार्यकर्ता नेमला आहे. त्यास अनुसरुन सर्व काम पूर्ण झाले आहे.
– विनायक रणसुभे,  मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा

SCROLL FOR NEXT