पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक व प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सोमवारी (दि.11) सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत चौथी जनसंवाद सभा होणार आहे. यापूर्वी दर सोमवारी याप्रमाणे तीन जनसंवाद सभा पार पडल्या आहेत.
महापालिका बरखास्त झाल्याने नागरिकांच्या तक्रारी व सूचना ऐकून घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभा आयोजनाचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी घेतला आहे. त्यानुसार दर आठ दिवसांनी क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी सभा होते.
पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय कार्यालयातील सर्व विभागप्रमुख त्या सभेला उपस्थित असतात. यावेळी आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसतील नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने निरसन केले जाते. ही जनसंवाद सभा क्षेत्रीय कार्यालयात पार पडल्यानंतर आढावा महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील घेतात.