पुणे

पिंपरी अस्वच्छ करणाऱ्यांची खैर नाही

backup backup

पिंपरी : मिलिंद कांबळे : स्वच्छ सर्वेक्षणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जनजागृतीसोबत दंडात्मक कारवाई केली जात आहे.

गरज पडल्यास कारवाई मोहीम अधिक तीव्र केली जाणार असून, शहर अस्वच्छ करणार्‍यांची खैर केली जाणार नाही, असा इशारा महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी गुरुवारी (दि.10) दिला आहे.

'स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छाग्रह' या अभियानाबाबत आयुक्त पाटील म्हणाले, की इंदूर पॅटर्न पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरातील सर्व कचराकुंड्या हटविण्यात आल्या आहेत.

घरातून ओला व सुका कचरा घंटागाडीत वेगवेगळा गोळा केला जात आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहरात कचरा विलगीकणाचे प्रमाण वाढले आहे.

सध्या 70 ते 80 टक्के कचर्‍याचे विलगीकरण होत आहे. कचरा स्वीकारण्यासाठी घंटागाड्यांच्या फेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत.
शहरातील मोठे रस्ते साफ करण्यासाठी यांत्रिक वाहनांची मदत घेण्यात येत आहे.

त्यासाठी 2 महिने कालावधीची निविदा राबविली आहे. सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन कायमस्वरूपी यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई केली जातील.

वेस्ट टू एनर्जी प्रकल्प ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. त्यासाठी 500 ते 600 मेट्रिक टन ओला कचरा पुरेसा आहे.
उघड्यावर कचरा टाकणारे नागरिक, रुग्णालय, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी व विक्रेत्यांवर ग्रीन मार्शल पथकाद्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे.

त्यासाठी ग्रीन मार्शलचे एकूण 16 पथके तैनात केले आहेत. तसेच, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. गरज पडल्यास कारवाई मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

शहरातील आठ ठिकाणी मोफत स्वीकारणार राडारोडा

बांधकामाचा राडारोडा कोठेही टाकला जात असल्याने शहर विद्रूप होत आहे. तो राडारोडा आता महापालिका मोफत स्वीकारणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय 8 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे.

त्या ठिकाणी नागरिकांना राडारोडा टाकता येणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार आहे. अ क्षेत्रीय कार्यालयासाठी निगडी पोलिस स्टेशनजवळ, ब क्षेत्रीय कार्यालयासाठी रावेतमधील म्हस्केवस्ती,

क क्षेत्रीय कार्यालयासाठी गवळीमाथा येथील कचरा संकलन केंद्र, ड क्षेत्रीय कार्यालयासाठी वाकड हायवे येथील व्हीजन मॉल, ई क्षेत्रीय कार्यालयासाठी चर्‍होली स्मशानभूमी,

फ क्षेत्रीय कार्यालयासाठी स्पाइन रस्ता, यमुनानगरातील अंकुश चौक, ग क्षेत्रीय कार्यालयातील थेरगाव स्मशानभूमीजवळ आणि ह क्षेत्रीय कार्यालयासाठी दापोडी रेल्वे स्टेशनजवळ राडारोडा टाकता येणार आहे. इतरत्र राडारोडा टाकल्यास दंड करून फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असे आयुक्त पाटील यांनी सांगितले.

https://youtu.be/gfZJcopVz0g

SCROLL FOR NEXT