पिंपरी : शशांक तांबे : औद्योगिक क्षेत्रातील विविध संशोधनांमुळे उद्योगनगरीमध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंगचे प्रमाण वाढत आहे. रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असून, विशेष म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल क्षेत्रात अभियंत्यांची मागणी वाढली आहे.
कोरोना काळातील निर्बंध आणि टाळेबंदीमुळे देश-विदेशांमध्ये होणारे आदान-प्रदान बंद होते. ऑनलाइन मीटिंग होत होत्या. तरीदेखील तांत्रिकी माहिती ऑनलाइन देणे फारसे सोपे नसल्याने टेक्निकल क्षेत्रातील व्यवहार ठप्प होते.
शहरात निर्बंध हटवले गेल्यानंतर उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येऊ लागले आहे. कंपन्यांचे उत्पादन सुरू झाल्याने रिव्हर्स इंजिनिअरिंगला मागणी वाढली आहे. ज्या कंपन्यांचे मुख्य ऑफिस परदेशात आहे आणि त्यांचे शहरात उत्पादन आहे, अशा कंपन्या रिव्हर्स इंजिनिअरिंगला पसंती देतात.
संपूर्ण प्लांट किंवा मोठ्या मशिनरी शहरात घेऊन येणे शक्य होत नसल्याने रिव्हर्स इंजिनिअरिंग करणे सोयीचेे होते.
उद्योगनगरीमध्ये अशा परदेशी कंपन्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही महिन्यांत परदेशी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शहरातील विविध कंपन्यांना भेटी दिल्या आहेत.
यात रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून मशिनचे उत्पादन करून कंपन्यांना विकण्याबाबत पाहणी झाली. नुकत्याच झालेल्या इपटेक्स22 आणि ग्राइंडेक्स या औद्योगिक प्रदर्शनात अनेक परदेशी कंपन्यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंगसाठी सहभाग नोंदविला होता.
एखादी मोठी कंपनी मशिन बनविण्याचे काम करीत असून, त्यांना दुसर्या देशात त्यांचा प्लांट सुरू करायचा आहे, तर कंपनीकडून जे मशिन बनवायचे असेल त्या मशिनप्रमाणे दुसरी मशिन बनविण्याचे काम दुसर्या देशातील कंपनीला दिले जाते. आधीच्या मशिनप्रमाणे हुबेहूब दुसरी मुशन बनवून त्यावर उत्पादन सुरू केले जाते. त्यामुळे पैसे, वेळेची बचत होते.
शहरात ऑटोमोबाईल आणि त्यासंबंधी लागणार्या पार्ट्सचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे परदेशी कंपन्या पिंपरी-चिंचवडमधील छोट्या कंपन्यांना काम देण्यास तयार होतात. त्यामुळे किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते.
रिव्हर्स इंजिनिअरिंग वाढल्याने इंजिनिअरिंग अभ्यासक्रमातील सँडविच कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दोन अभ्यासक्रम एकत्र करून सँडविच कोर्स तयार केला जातो. पुण्यात ठरावीक कॉलेजमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो. शहरात रिव्हर्स इंजिनिअरिंगचे काम वाढल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत.
रिव्हर्स इंजिनिअरिंग हे ऑटोमोबाईल, मोबाईल,वाहननिर्मिती अशा सर्वच क्षेत्रांत वापरले जात आहे. त्यामुळे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागते. गेली दोन वर्षे उत्पादन क्षेत्राला फटका बसला. परंतु, मशिन क्षेत्रातील संशोधन सुरू होते. त्यामुळे रिव्हर्स इंजिनिअरिंगमध्ये वाढ झाली आहे.
– वीरेश नाथन, मशिन डिझाइन, सल्लागार