पिंपरी : भारतात फिरण्यासाठी आलेल्या एका कोरियन तरुणीसोबत पिंपरी-चिंचवड शहरात एका फळ विक्रेत्याने गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ व्हायरल होताच गुंडाविरोधी पथकाने या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भरत करणराव हुनुसनाळे (29, रा. रावेत मूळगाव – कर्नाटक) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणावर रावेत पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवाळीपूर्वी नोव्हेंबर महिन्यात एक कोरियन तरुणी भारतात फिरण्यासाठी आली होती. भारतात आल्यानंतर तरुणी शहरात आली. दिवाळीदरम्यान खरेदीसाठी ती रावेतमधील भोंडवे कॉर्नर येथील फळांच्या बाजारात गेली. बाजार पाहत असतानाच ती आपल्या मोबाईलद्वारे सर्व चित्रीकरण करत होती. मात्र, त्याच दरम्यान येथील एका फळाच्या दुकानात काम करणारा आरोपी भरत हुनुसनाळे हा तरुणीच्या अगदी जवळ गेला. तरुणीच्या गळ्यात हात टाकला. तसेच, गळ्याभोवती हाताने पकडत फोटो काढला. या प्रकारानंतर तरुणी निघून गेली. दरम्यान, मंगळवारी (दि. 19) याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुंडाविरोधी पथकाने आरोपी तरुणाला अटक केली आहे.
हेही वाचा