पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध शंकांचे निरसन, शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी आणि वाटपासंंबंधित आढावा घेण्यासाठी अन्न पुरवठा अधिकाऱ्यांकडून दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. धान्य वाटपातील अडथळे, ई पॉस मशिनच्या समस्या सोडविण्यात येणार आहे. तसेच, धान्य दुकानदारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात येणार असल्याचे अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.(Latest Pimpri chinchwad News)
धान्य वाटपासंबंधित अनेक शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी असतात. तसेच, ई पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याचे दुकानदार सांगतात. दुसरीकडे राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिवाळीपूर्वी वाढीव कमिशन देण्याचे आश्वासन दिले होते. अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचे दुकानादारांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुकानदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 253 दुकानदारांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे वाढीव कमिशन त्वरित मिळावे, अशी मागणी होत आहे. या सर्वच प्रश्नांच्या अनुषंगाने दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे.
सरकारने वाढीव कमिशन जाहीर केले असले तरी निधी मिळालेला नाही. अन्नधान्य वितरणाच्या प्रक्रियेत अनेक अडचणी येत आहेत. त्या तातडीने दूर करून दुकानदारांना दिलासा द्यावा.विक्रम छाजेड, स्वस्त धान्य दुकानदार
दुकानांची तपासणी वेळोवेळी होत असते. त्या अनुषंगाने तक्रारीचे निरसण केले जाते. ई पॉस मशीन अपडेट केल्या आहेत. त्याही समस्या दूर होतील. स्वस्त दुकानांचे दोन महिन्यांचे कमिशन संबधित खात्यात जमा झाले आहेत.विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी,
शहरात 253 स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत धान्याचा पुरवठा केला जातो. आम्हांला अत्यल्प दराने कमिशन मिळत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. शंभर किलो धान्य विक्रीवर 150 रुपये कमिशन मिळत होते. दरम्यान 20 ऑगस्टपासून हा दर वाढवून 170 रुपये प्रति क्विंटल इतके कमिशन वाढ देण्याची मागणी शहरातील धान्य दुकानदार आणि संघटना करत आहेत.