पुणे

पिंपरी-चिंचवड शहराला दस्तनोंदणीतून कोटींचा महसूल, मात्र सुविधांकडे दुर्लक्ष

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील सातही दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये सर्व्हर डाऊनची समस्या ही नित्याचीच झाली आहे. आठवड्यातून किमान 4 दिवस सर्व्हरचा वेग मंदावलेला असतो. तर, आठवड्यातून किमान एक दिवस तरी चार-पाच तासांसाठी सर्व्हर बंद असतो. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी येणार्‍या नागरिकांना तासनतास ताटकळत थांबावे लागते. एकीकडे सर्व्हर डाऊनची ही परिस्थिती असताना दुसरीकडे या कार्यालयांमध्ये विविध सुविधांची देखील वाणवा असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

शहरातील 7 सह-दुय्यम निबंधक कार्यालयांना दस्त नोंदणीमधून दरमहा कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. त्या तुलनेत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. सह-दुय्यम निबंधक कार्यालये ही राज्य सरकारला मोठा महसूल मिळवून देतात. या कार्यालयांमध्ये भाडे करार, गहाणखत, सदनिका करारनामे अशा विविध दस्तांची नोंदणी होते. या कार्यालयांमध्ये करण्यात येणार्या दस्त नोंदणीतून दरमहा कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामधून राज्य शासनाला खूप मोठा महसूल दररोज मिळतो.

पिंपरीतील कार्यालयांचे वातावरण कोंदट

पिंपरी येथे दोन सह-दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. या कार्यालयांची जागा लहान आहे. नागरिकांना बसण्याची पुरेशी व्यवस्था नाही. कोंदट वातावरण, मंद प्रकाश आहे. तासनतास आपल्या नंबरची वाट पाहत बसलेले ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती येथे पाहण्यास मिळतात. पासपोर्ट कार्यालय, पोस्ट ऑफिस, एसटी महामंडळ आदी कात टाकत असले तरी दस्त नोंदणी कार्यालयाची दुरवस्था दूर होऊन ही कार्यालये नव्याने कात कधी टाकणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

सुविधांकडे होतेय दुर्लक्ष

पिंपरी-चिंचवड शहरातील सह- दुय्यम निबंधक कार्यालयांमधील परिस्थिती अतिशय केविलवाणी आहे. येथील कार्यालयात सध्या सर्व्हर डाऊनची समस्या जाणवत आहे. आठवड्यातून चार दिवस सर्व्हरचा वेग मंद असतो. तर, आठवड्यातून किमान एक दिवस चार ते पाच तासांसाठी सर्व्हर बंद पडतो. त्यामुळे दस्त ज्या दिवशी नोंदणीसाठी दिले त्यांची त्याच दिवशी नोंद होणार की नाही, याची शाश्वती नसते. कार्यालयांमध्ये सतत जाणवणार्या सर्व्हर डाऊन समस्येमुळे दस्त नोंदणीसाठी येणार्या नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येने नागरिकांच्या दस्ताची नोंदणी विलंबाने होत आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT