Leopard  Pudhari
पुणे

Pimperkhed Leopard Sighting: पिंपरखेड-जांबूत परिसरात पुन्हा बिबट्यांची दहशत; भरदिवसा दर्शनाने नागरिकांमध्ये भीती

पिंपरखेडमध्ये मृत्यू झालेल्या घटनास्थळापासून अवघ्या पाच मिनिटांवर बिबट्या; पूर गावठाणालगतही बिबट्याचा वावर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरखेड: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील आंबेवाडी परिसरात मंगळवारी (दि. ६) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास बिबट्या भर दिवसा निदर्शनास आला. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२५ मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थी रोहन बोंबे याचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनास्थळापासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर बिबट्या आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

गेल्या ४ ते ५ वर्षांत पिंपरखेड-जांबूत परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये ९ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हा परिसर अतिसंवेदनशील बिबटप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. रोहन बोंबे तसेच शिवण्या बोंबे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नागरिकांनी आंदोलने केली होती. त्यानंतर वन विभागाच्या माध्यमातून परिसरातून ५० हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात आले. मात्र, सध्या पुन्हा बिबट्यांचा वावर वाढल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत असल्याने परिस्थिती 'जैसे थे' होण्याची भीती व्यक्त होत आहे.

बिबट्या आढळल्यानंतर वन विभागाकडून विविध ठिकाणी पिंजरे लावले जातात. या पिंजऱ्यांमध्ये कोंबडीसारखे भक्ष्य ठेवण्यात येते. मात्र, बिबट्या पिंजऱ्याला चकवा देऊन आजूबाजूने निघून जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे केवळ पिंजरे लावण्याऐवजी बिबट्यांच्या हालचालींचा तांत्रिक पद्धतीने मागोवा घेऊन वन्यजीवतज्ज्ञांच्या मदतीने त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पूरमध्ये भर दिवसा दिसला बिबट्या

पूर (ता. खेड) गावात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असतानाच रविवारी (दि. ५) सायंकाळी सहाच्या सुमारास गावठाणाच्या अगदी जवळील झेंडूच्या शेतात बिबट्या भर दिवसा दिसल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. पूर आणि कनेरसर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी वाघोबा माळ परिसरात पाळीव कुत्र्याला घेऊन जात असलेला बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. आता थेट गावठाणालगतच बिबट्याचे दर्शन झाल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पूर गाव विखुरलेले असून गावठाणापासून विविध वस्त्यांपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. या मार्गावर सामाजिक वनीकरणाची दाट झाडी असून मोठ्या प्रमाणात दडण आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

हा परिसर अतिसंवेदनशील असून बिबट्यांच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाईल. नागरिकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी या काळात सतर्क राहून स्वतःची काळजी घ्यावी.
प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक, जुन्नर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT