पिंपरखेड: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे.या धक्कादायक बातमीमुळे ऐन जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार थांबवत बेट भागातील गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असताना राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य जनतेतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच पक्षांचे कार्यकर्ते प्रचारात व्यस्त होते. मात्र, अजित पवार यांच्या निधनाची बातमी धडकताच, आदर व्यक्त करत सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांचा निवडणूक प्रचार तत्काळ थांबवला आहे. "एक कार्यक्षम प्रशासक आणि परखड व्यक्तीमत्व, राजकारणातील धुरंधर नेता हरपला," अशा भावना सर्व पक्षीय कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होत्या.
बेट भागातील सर्वच गावांमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. बातमी समजताच ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवले आहेत.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा आणि व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत.जांबुत येथील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.गावागावातील नागरिकांनी एकत्र येत अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली.बेट भागात अनेक सार्वजनिक ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अजित पवार हे त्यांच्या शिस्तीसाठी आणि कामाच्या धडाक्यासाठी ओळखले जात होते. पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा हा लोकनेता अशा प्रकारे काळाच्या पडद्याआड गेल्याने प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.अजितदादांचे जाणे हा केवळ एका पक्षाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा तोटा असल्याच्या भावना पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनाने राज्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ निखळल्याच्या भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत.