Pimpergane Wildflowers Pudhari
पुणे

Pimpergane Wildflowers: रानफुलांनी सजले पिंपरगणेचे डोंगर; हिरवाई अन् निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भुरळ

पर्यावरणपूरक पर्यटन विकासाची गरज

पुढारी वृत्तसेवा

पारगाव: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पिंपरगणे गाव सध्या विविधरंगी रानफुले, हिरवाई आणि निसर्गसौंदर्याने बहरले आहे. डोंगररांगा, हिरवीगार शेती, डोंगर उतारांवरील फुलांची चादर, स्वच्छ हवा आणि शांत वातावरणामुळे हा परिसर निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.

पावसाळ्यानंतर परिसराने धारण केलेले निसर्गरम्य रूप पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.पिंपरगणे परिसरातील डोंगररांगा आणि शेतांच्या बांधांवर पिवळी, जांभळी तसेच विविध रंगांची रानफुले उमलली आहेत.

हिरव्यागार गवताच्या पार्श्वभूमीवर फुललेल्या या रानफुलांमुळे परिसराचे सौंदर्य खुलले आहे. डोंगर उतारांवर दूरवर पसरलेली हिरवाई आणि त्यामध्ये उठून दिसणारी फुलांची चादर निसर्गप्रेमींना भुरळ घालत आहे.

पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य

पर्यटन विकास करताना निसर्गाचे मूळ सौंदर्य आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे, कचरा न टाकणे, रानफुले आणि वनस्पतींचे नुकसान न करणे तसेच ध्वनिप्रदूषण टाळणे गरजेचे आहे.

स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या सहकार्याने शाश्वत पर्यटन विकसित केल्यास पिंपरगणेची स्वतंत्र निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून ओळख निर्माण होऊ शकते, असे माजी उपसरपंच भीमा गवारी यांनी सांगितले.

निसर्ग पर्यटनाला मोठी संधी

डोंगररांगा, पारंपरिक शेती, मोकळी शेतजमीन, नैसर्गिक पायवाटा आणि शांत वातावरणामुळे पिंपरगणे येथे निसर्गभ्रमंतीसाठी येणाऱ्या नागरिकांना वेगळा अनुभव मिळत आहे. सकाळच्या वेळी डोंगरांवर पडणारे कोवळे ऊन, हिरवाईतून वाहणारा गार वारा आणि रंगबिरंगी रानफुलांचे सौंदर्य परिसराला अधिकच आकर्षक बनवते.

या नैसर्गिक सौंदर्याचा पर्यावरणपूरक पद्धतीने विकास केल्यास पिंपरगणे निसर्ग पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र होऊ शकते. सुरक्षित पायवाटा, माहितीफलक, स्वच्छतागृहे, वाहनतळ, स्थानिक खाद्यपदार्थ आणि मार्गदर्शकांची सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांना चांगला अनुभव मिळू शकतो. त्यातून स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT