शिवाजी शिंदे
पुणे: राज्यातील शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या क्षेत्रातील मूळ आणि विस्तारित भागांचे (शासकीय/खासगी जागा) मापन करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या भूमिअभिलेख विभागाच्या वतीने ‘नक्षा’ हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार राज्यात पहिल्या टप्प्यात दहा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड केली आहे. त्यामध्ये बारामती (पुणे), पंढरपूर (सोलापूर), कुळगाव-बदलापूर (ठाणे), शिर्डी, वरणगाव (जळगाव), कन्नड (छत्रपती संभाजीनगर), बुलडाणा, खोपोली (रायगड), घुग्घूस (चंद्रपूर), मूर्तीजापूर (अकोला) या नगरपालिका व नगरपंचायत समितीमध्ये प्रकल्प राबविला जाईल. (Latest Pune News)
राज्यात सुमारे 48 टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते. या भागाची वाढती लोकसंख्या, विकासांचे विविध कार्यक्रम, भौगोलिक बदल यामुळे जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया जलद होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मूळ आणि विस्तारित भागातील भूमिअभिलेख विविध विकासकामांसाठी नकाशे अद्ययावत करणे गरजेचे आहे.
ही बाब लक्षात घेऊन ‘नक्षा’ हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागाकडून डिजिटल लँड रेकॉर्डस् मॉडर्नायझेशन प्रोग्राम (डीआयएलआरएलपी) अंतर्गत भारतीय सर्वेक्षण संस्थेच्या सहकार्याने अभिलेख (नकाशे) तयार करणासाठी ‘नॅशनल जिओस्पेटिकल नॉलेज बेस्ड लँड सर्व्हे ऑफ अर्बन हॅबिटेटेशन्स’ (नक्षा) प्रकल्प राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविणात येणार आहे. या प्रकल्पासाठी भारतीय सर्वेक्षण विभाग (डेहराडून), नगर विकास विभाग, भूमिअभिलेख यांचे सहकार्य लाभणार आहे.
नागरिकांना असे होणार फायदे
जीआयएस नकाशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना शहरी नियोजनात विकास आराखडा तयार करता येणार
या संस्थांचे जीआयएसवरील थ्रीडी नकाशे उपलब्ध झाल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन करणे सोपे जाणार
या भागात असलेल्या मिळकतीचे (जमिनी, घरे ई.) यांना चांगला बाजारभाव मिळणार
मोकळ्या जागा, रस्ते या भगांवर होणारे अतिक्रमण रोखण्यास मदत होणार
नागरिकांना मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) मिळणार
जागांचे भाव वाढणार, प्रॉपर्टी कार्डमुळे नागरिकांना कर्ज मिळणे सोपे
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येणारा नक्षा या पथदर्शी प्रकल्पासाठी दहा नगरपालिकांची निवड करण्यात आली आहे. त्यामधील दोन नगरपालिकांमध्ये ड्रोन सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम सर्व्हे ऑफ इंडिया विभागाच्या वतीने सुरू आहे.- डॉ. सुहास दिवसे, राज्य आयुक्त भूमिअभिलेख