

बारामती : विविध कारनाम्यांमुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आलेल्या विद्यानंद ॲग्रो फीड्स लि. च्या आनंद सतीश लोखंडे (रा. विद्यानंद हाऊस जळोची, बारामती) याच्यावर अखेर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ॲग्रो फार्ममध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा २० टक्के इन्सेन्टीव्ह देवू, असे अमिष दाखवून १ कोटी ५० लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आकाश उर्फ सुयोग कुंडलिक भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली.
फिर्यादी आकाश भिसे व अजय शिवाजी ओमासे (रा. एमआयडीसी) हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. सन २०२४ मध्ये अजय याने आकाशची ओळख लोखंडे याच्याशी करून दिली. लोखंडे याने या दोघांना विद्यानंद फिड्स ॲग्रो लि. मध्ये तुम्ही रोख स्वरुपात पैसे गुंतवा, मी तुम्हाला गुंतवलेल्या रकमेवर दरमहा १० तारखेला २० टक्के इन्सेन्टीव्ह देईन असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून आकाशने दोन लाख रुपये तर ओमासे यांनी मित्र व नातेवाईकांकडून १ कोटी ४८ लाख रुपये घेत ती रक्कम लोखंडे याला ऑनलाइन पद्धतीने देवू केली असता लोखंडे याने नकार दिला.
ऑनलाइन पद्धतीने दिली तर १८ टक्के जीएसटी भरावा लागतो, तुम्ही रोख स्वरुपातच रक्कम द्या अशी मागणी केली. त्यानुसार जुलै २०२४ मध्ये या दोघांनी १ कोटी ५० लाख रुपये त्याला दिले. यावेळी अजयसह अक्षय मोहन खुरंगे (रा. राजुरी, ता. फलटण, जि. सातारा), गणेश रमेश मोरे (रा. मोरेमळा, गुरसाळे, ता. माळशिरस, जि. सोलापूर), उज्ज्वला आनंद जगताप (रा. जवळार्जून, ता. पुरंदर) हे लोक हजर होते.
पैसे गुंतवल्यानंतरही या दोघांना इन्स्टेव्हीची रक्कम मिळाली नाही. बँक खात्यावर रक्कम जमा होईल असे सांगितले, पण तेथेही झाली नाही. त्यामुळे या दोघांना शंका आली. आम्हाला इन्सेन्टीव्ह नको आमचीच रक्कम परत करा, अशी मागणी त्यांनी केली. परंतु लोखंडे याने माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्हाला हर्ष आयकॉन एमआयडीसी बारामती येथील मालमत्ता करारनामा करून लिहून देतो, असे सांगितले. १५ ऑक्टोबर रोजी लोखंडे याने एमआयडीसीतील फ्लॅट नं. २६ हा ४१.२७ चौरस मीटर व फ्लॅट क्रमांक २७ ची ५६.६३ चौरस मीटरचा फ्लॅट करारपत्र करून ओमासे यांना दिला. तीन महिन्याचा कालावधी त्यात नमूद करण्यात आला. त्यानंतर या दोघांनी पैसे मागितले असता ३ लाख ७ हजार रुपये एप्रिल २०२५ मध्ये देण्यात आले. त्यापैकी ५० हजार रुपये फिर्यादीला मिळाले.
दि. १४ मे रोजी लोखंडे याने स्वतःच्या घराजवळ पैसे देतो असे सांगून या दोघांना बोलावून घेतले. यावेळी खुरंगे हे देखील सोबत होते. त्यावेळी लोखंडे याने रक्कम घेवून येतो असे सांगत बाहेर येत अंगावर धावून येत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. खुरंगे याने लोखंडे याला समजवण्याचा प्रयत्न केला असता लोखंडे याने फिर्यादीला जातीवाचक शिविगाळ केली. तू आता पैसे विसरून जा. पुन्हा पैशाचा विषय काढला तर तुला जीवंत सोडणार नाही, मी आत्तापर्यंत लोकांना ५०० कोटींचा चुना लावला आहे. असे म्हणत फिर्यादीच्या हातातील अंगठी जबरदस्तीने हिसकावून घेतली. फिर्यादीने ११२ क्रमांकाला फोन करत पोलिसांना हा प्रकार कळवला.