पुणे: काही नवे, काही जुने दिग्दर्शक एकत्र आले आणि त्यांनी उलगडल्या त्यांच्या मराठी चित्रपटनिर्मितीमागील कथा. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मंगळवारी (दि. 20) मराठी चित्रपट स्पर्धेतील दाखविण्यात आलेल्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी चित्रपटनिर्मितीची कथा उलगडली. या कार्यक्रमाला चित्रपटप्रेमींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रमेश मोरे (आदिशेष), मोहित टाकळकर (तो, ती आणि फुजी), जिजीविषा काळे (तिघी), रवींद्र माणिक जाधव (जीव), संतोष डावखर (गोंधळ), मनोज नाईक साठम (गमन) आणि समीर तिवारी (बाप्या) यांनी दिग्दर्शकांबरोबर ‘पिफ’चे उपसंचालक विशाल शिंदे यांनी संवाद साधला.
‘तिघी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका जिजीविषा काळे म्हणाल्या, माझा प्रवास ‘वजनदार’ या चित्रपटात सहाय्यक म्हणून सुरू झाला. आता 12 वर्षांनी माझा दिग्दर्शक म्हणून चित्रपट येतोय. पालकांची मी एकुलती एक मुलगी असल्याने मला सतत एकटे वाटत आले आणि तीच गोष्ट मी माझ्या चित्रपटातून मांडली आहे. ‘तो, ती आणि फुजी’, या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणाले, “मी पूर्वीपासून नाटकांमध्ये काम केले. पण, चित्रपट तयार करण्याचा विचार मनात सतत घोळत होता. त्यातून मग पुढे चित्रपट कण्याचा निर्णय घेतला. शहरी जीवनात नात्यांमध्ये बदल घडतात, तेच मी माझ्या आताच्या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.”
‘जीव’चे दिग्दर्शक रवींद्र माणिक जाधव म्हणाले, धुळ्यात शिक्षक म्हणून मी काम करतो. मात्र, चित्रपट करण्याचा विचार मनात होता आणि त्यातून मी 2013 रोजी पहिला माहितीपट तयार केला. हॅंडी कॅमेराद्वारे माहितीपट तयार केले. चित्रपट कसा तयार करायचा हे माहीत नव्हते. पुढे चित्रपट निर्मितीकडे वळलो.
‘गमन’चे दिग्दर्शक मनोज नाईक साटम म्हणाले, “मी छायाचित्रकार असल्याने वेडिंग शूट करायचो. तेव्हा व्हिडीओ शूटिंगबद्दल शिकलो आणि त्यातून चित्रपट तयार करण्याचा विचार मनात आला. एक कथा डोक्यात होती, ती लिहिली त्याची पुढे कादंबरी झाली. ती 2015 मध्ये प्रसिद्ध झाली आणि उमेद आली. त्याचाच पुढे चित्रपट झाला. ‘बाप्या’चे दिग्दर्शक समीर तिवारी, ‘आदिशेष’चे दिग्दर्शक रमेश मोरे, ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर यांनीही त्यांच्या चित्रपटनिर्मितीबद्दल सांगितले.
चित्रपट तयार करीत राहा, यश मिळेल : डॅन वॉलमन
चित्रपट तयार करण्याचे काम कायम करीत राहा, थांबू नका, यश मिळेल, असा सल्ला इस्रायल येथील चित्रपटदिग्दर्शक डॅन वॉलमन यांनी नवोदित दिग्दर्शकांना दिला.
‘कमी संसाधनांतून सर्जनशीलतेकडे: नव्या स्वतंत्र दिग्दर्शकांना सल्ला’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. डॅन वॉलमन म्हणाले, “कायम काम करीत राहा आणि चित्रपट तयार करीत राहा. आपल्याला हवी तशी परिस्थिती तयार होईल तेव्हा चित्रपट तयार करू, असा विचार करीत बसू नका. कमी खर्चाच्या कथा निवडा. कथा अशीच निवडा की ज्याच्यामध्ये लोकेशन आणि अभिनेत्यांवर जास्त खर्च होणार नाही आणि चित्रपट करण्यापूर्वी कालावधीचा विचार करा.