पुणे : राज्य सरकार आणि पुणे फिल्म फाउंडेशनतर्फे आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत (पिफ) शनिवारी (दि. 11) आणि रविवारी (दि. 12) विशेष ‘मान्सून एडिशन चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही दिवशी विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सहा जागतिक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.(Latest Pune News)
या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. मान्सून एडिशनमधील चित्रपट चित्रपटप्रेमींना विनामूल्य पाहता येणार आहेत, अशी माहिती पिफच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट निवड समितीच्या उपसंचालिका अदिती अक्कलकोटकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
या महोत्सवात रसिकांना सहा जागतिक चित्रपट पाहता येतील. शनिवारी (दि. 11) सायंकाळी चार वाजता ‘द टाइम इट टेक्स’ (दिग्दर्शक फ्रािन्सिस्का कोमेन्सिनी, फ्रान्स, इटली), सायंकाळी सव्वासहा वाजता ‘प्लास्टिक गन्स - दिग्दर्शक जीन’ (क्रिस्टोफ म्युराइज, फ्रान्स) आणि रात्री सव्वाआठ वाजता ‘माय एव्हरीथिंग’ (दिग्दर्शक ॲनी सोफी बेली, फ्रान्स) हे चित्रपट दाखविले जातील. रविवारी (दि. 12) सायंकाळी चार वाजता ‘डेलिरिओ’ (दिग्दर्शक ॲलेक्झांड्रा लॅटिशेव्ह सालाझार, कोस्टारिका, चिली),
सायंकाळी साडेपाच वाजता ‘द वेलिंग’ (दिग्दर्शक पेड्रो मार्टिन सॅलेरो, स्पेन, फ्रान्स, अर्जेंटिना) आणि रात्री साडेसात वाजता ‘माँग्रेल’ (दिग्दर्शक वि लियांग चियांग, यू कियाओ यिन, तैवान, सिंगापूर, फ्रान्स) हे चित्रपट दाखिवण्यात येणार आहेत. या महोत्सवासाठी जगभरातून आलेल्या चित्रपटांतून या सहा चित्रपटांची निवड केली असून, विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
दरवर्षी होणाऱ्या पिफबरोबर चित्रपटप्रेमींना मध्यंतरीच्या काळातील आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहता यावेत, या उद्देशाने ‘मान्सून एडिशन’चे आयोजन केले आहे, असेही अक्कलकोटकर यांनी सांगितले.