पुणे

पर्यटनस्थळे निर्बंधमुक्त; ‘एमटीडीसी’ पूर्ण खुली

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोना आटोक्यात आल्याने पर्यटनस्थळे निर्बंधमुक्त झाली आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) निवासस्थानेही पूर्ण क्षमतेने खुली करण्यात आली आहेत.

शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. सुट्यांमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे नियोजन सुरू केले असून, महामंडळाकडून उन्हाळी सुटीनिमित्त खास सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
याशिवाय विविध शिबिरे, प्रोत्साहनपर पारंपरिक खेळ, योग आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दिवाळी, नाताळनंतर उन्हाळी सुटीतही पुणे महामंडळाची निवासस्थाने 95 टक्के आरक्षित झाली आहेत.

कोरोना आटोक्यात आल्याने सर्व निर्बंध दूर करण्यात आले आहेत. परीक्षा संपल्याने सुट्यांच्या कालावधीमध्ये भटकंती करण्यासाठी पर्यटकांचे नियोजन सुरू झाले आहे. विशेषतः यंदा उन्हाच्या तीव्र झळा पोहचत असून, सुटीमध्ये समुद्रकिनारा, थंड आणि निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांचा ओढा ऑनलाइन आरक्षणातून दिसून आला आहे.

याबाबत माहिती देताना महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले, 'या हंगामामध्ये पर्यटकांसाठी अनुभवात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्थानिक स्तरावर स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडित व्यावसायिकांना आणि उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. योग आणि निरोगी जीवनशैलीबाबतची शिबिरे घेण्यात येणार असून स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यांसारखे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध छंद, पारंपरिक खेळ इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. कोरोनानंतर दिवाळी, डिसेंबर आणि आता उन्हाळी सुटीतही महामंडळाच्या पुणे विभागातील निवासस्थानांना पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनानंतर प्रथमच ही स्थिती दिसून येत असून, सध्या 10 जूनपर्यंत महामंडळाची 95 टक्के निवासस्थाने आरक्षित झाली आहेत.'

राज्यातील या ठिकाणांना पर्यटकांची पसंती

कडक उन्हाळ्यामध्ये पर्यटक जल पर्यटनासाठी गर्दी करीत आहेत. पुणे विभागातील महाबळेश्वर, लोणावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे ही ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत. महामंडळाकडून पर्यटकांना निखळ पर्यटन, निसर्ग आणि अप्रतिम खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. पर्यटकांसाठी www.mtdb.bo या संकेतस्थळावर ऑनलाइन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT