Physical Education Teachers Protest Pudhari
पुणे

Physical Education Teachers Protest: शारीरिक शिक्षकही जाणार संपावर; येत्या 27 एप्रिलपासून आझाद मैदान मुंबईत शिक्षकांचे उपोषण

सोमवार दि. 27 एप्रिल 2026 पासून आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यात गेल्या वीस वर्षांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरतीला शासनाने दुर्लक्ष केल्याने हजारो बी.पी.एड. व एम.पी.एड. पडवीधर आजही बेरोजगार आहेत. या दीर्घकालीन अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने अखेर लढाईचा बिगुल फुंकला असून, सोमवार दि. 27 एप्रिल 2026 पासून आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

या बेमुदत धरणे आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शारीरिक शिक्षक सहभागी होणार आहेत. हे बेमुदत धरणे आंदोलन पूर्णपणे शांततामय व कायदेशीर मार्गाने करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद केंद्रस्तरावरील दि. 2 जानेवारी 2026 शासन निर्णयानुसार क्रीडा शिक्षकांची जागा पूर्णक्षमतेने 100 टक्के पवित्र पोर्टल टेट परीक्षा 2025 मधून भरतीच्या पहिल्या टप्प्यात भराव्यात, स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद प्रशाला शाळेतील दि. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयान्वये रिक्त होणाऱ्या पदावर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टल टेट 2025 अंतर्गत पूर्ण क्षमतेने भरण्यात यावीत.

जिल्हा परिषद केंद्रशाळा, माध्यमिक शाळा, महानगरपालिका व नगरपालिका शाळा, शासकीय आश्रमशाळा तसेच समाजकल्याण विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शारीरिक शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावीत.

पवित्र पोर्टल भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी संघटना मैदानात उतरणार आहे. संबंधित बेमुदत धरणे आंदोलनामध्ये राज्यभरातील हजारो पात्रताधारक शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक प्रद्युम्न जोशी, कैलास माने, विश्वनाथ पाटोले, अमोल जोशी, राज्याध्यक्ष संदीप मनोरे, राज्य सचिव तायाप्पा शेडगे आदी पदाधिकाऱ्यांना केले आहे.

कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

जुन्या पेन्शनसह दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला दुसऱ्या दिवशीही शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने पुकारलेल्या या संपात राज्यभरातील विविध 32 संघटना यामध्ये सहभाग घेतला आहे.

कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे शासनाच्या सर्व विभागांतील कामकाज कालपासून राज्यभर ठप्प झाले आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मारुती शिंदे यांच्यासह विजय लांघे, नंदकिशोर भरेकर, महेश घुले, कृष्णा साळवी, दिनेश कुचेकर, संध्या काळजे, प्रवीण इगवे, संजय कडाळे, दीपक धिवार, राजू चव्हाण, राहुल कडू, विनायक राऊत, सदानंद मोरडे, कांदेपल्ली यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी हजारोंच्या संख्येने या संपात सहभागी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT