महात्मा फुले वाडा, गंज पेठ, पुणे File Photo
पुणे

Mahatma Phule Memorial: स्मारकासाठी जागा देऊ, पण रोख रकमेऐवजी घरे द्या!; मोबदला वितरणाचा वाढणार तिढा

फुले स्मारक विस्तारीकरणात 85 टक्के जागामालक, भाडेकरूंची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या दोन ऐतिहासिक वास्तूंना एकत्रित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या स्मारकाच्या विस्तारीकरणाला गती मिळणार आहे. दोन्ही स्मारकांना जोडणार्‍या मधल्या जागांचे संपादन करण्यासाठी व आवश्यक असलेल्या जागांच्या मोबदल्याबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात सुमारे 85 टक्के जागामालक आणि भाडेकरूंनी रोख रकमेऐवजी घराची मागणी केली आहे. विशेष म्हणजे एकाच जागेसाठी मालक व भाडेकरू दोघांनीही घराची मागणी केली आहे. मात्र, विद्यमान नियमानुसार एका जागेसाठी दोघांनाही मोबदला देता येणार नसल्याने मोबदला वितरणाचा तिढा आणखी वाढणार आहे. (Pune Latest News)

महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या दोन ऐतिहासिक वास्तूंना एकत्रित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी शासनाने मागील वर्षी 200 कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, त्यानंतर कामाला अपेक्षित गती मिळाली नव्हती. यामुळे या कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न व औषध प्रशासनमंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया वेगात राबवण्यासाठी स्वतंत्र उपायुक्तांची नेमणूक करण्यात आली. या प्रकल्पात एकूण 119 सर्व्हे प्लॉट, त्यामध्ये 358 जागामालक, 624 भाडेकरू आणि 25 झोपड्यांसह एकूण 982 बाधित कुटुंबांचा समावेश आहे.या दृष्टीने प्रशासनाने चार क्लस्टरमध्ये विभागणी करून 12 जणांच्या पथकांमार्फत सर्वेक्षण पूर्ण केले. काही घरे केवळ 100 चौ. फुटांची तर काही 2 हजार चौ. फुटांपर्यंतची असल्याने मोबदल्याच्या गणनेसाठी अधिक कार्यक्षम नियोजनाची गरज भासणार आहे.

आयुक्त निश्चित करतील धोरण

संपूर्ण सर्वेक्षणाचा अहवाल आता महापालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार असून, मोबदला देण्यासंबंधीचे अंतिम धोरण ते निश्चित करतील. मात्र, सध्याच्या नियमांनुसार एकाच जागेसाठी दोघांनाही घर किंवा अन्य मोबदला देणे शक्य नसल्याने प्रशासनास शासनाची विशेष मान्यता घेऊन पर्याय शोधावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT