पुणे : महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकांचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा अडचणीत आला आहे. स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी महापालिकेने प्राथमिक मंजुरी देऊन भूसंपादन प्रक्रियेची तयारी केली असली, तरी बाधित नागरिकांचे पुनर्वसन याच परिसरात करण्याची मागणी पुढे आल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. (Latest Pune News)
राज्य सरकारने या राष्ट्रीय स्मारकासाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून प्रकल्प रखडला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर महापालिकेने उपायुक्तपातळीवरील अधिकाऱ्याची नियुक्ती करून सर्वेक्षण आणि बाधितांशी चर्चा सुरू केली.
महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार, 592 मालक आणि 326 भाडेकरू बाधित आहेत. या भागातील घरे सुमारे 50 ते 60 वर्षे जुनी असून, स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी 5,310 चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. बाधितांसाठी चार पुनर्वसन पर्याय देण्यात आले आहेत. महापालिकेने स्थायी समितीत सादर केलेल्या प्रस्तावानुसार जागाधारकांना रेडीरेकनर दराच्या दुप्पट मोबदला, तसेच बांधकाम खर्चाचा घसारा वजा करून उर्वरित खर्चाच्या दुप्पट रक्कम देण्यात येणार आहे. रोख मोबदल्यावर आयकर भरावा लागल्यास त्याची रक्कमही महापालिकेकडून देण्यात येणार आहे. तर, इच्छुकांना पालिकेच्या निवासी सदनिका दिल्या जाणार आहेत. भाडेकरूंनाही निवासी सदनिका मिळणार असून, या सदनिका मासिक 600 ते 1000 रुपये भाड्याने देण्यात येणार आहेत.
बाधितांचे पुनर्वसन त्याच भागात करण्याची स्थानिक आमदारांची मागणी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी बाधितांचे पुनर्वसन याच परिसरात व्हावे, असा आग््राह धरला आहे. या भागातील रहिवाशांचे हातावर पोट आहे. त्यांचे पुनर्वसन दूर केल्यास त्यांचा रोजगार धोक्यात येईल. महापालिकेच्या जवळपासच्या जागांचा वापर करून सुवर्णमध्य काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महापालिकेने मोबदला धोरण निश्चित करून शासनाला अहवाल पाठविला असून, शासनाने तातडीने भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पुनर्वसनाच्या जागेचा निर्णय न झाल्याने कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. प्रशासन एका बाजूला शासनाच्या दबावाखाली आहे, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे पेच निर्माण झाला आहे.
फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना असूनही पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास प्रकल्पाच्या गतीला पुन्हा बेक लागू शकतो. शहराच्या मध्यवर्ती भागातील जागेअभावी महापालिकेला नवीन जागा शोधावी लागणार आहे, ज्यासाठी वेळ आणि निधी दोन्ही आवश्यक आहे.