गणेशोत्सवात महिला-तरुणींची छेड काढणार्‍या रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी  जालीम उपाय शोधला असून, त्यांचे फोटो काढून भर चौकात फ्लेक्सवर लावले जाणार आहेत.
गणेशोत्सवात महिला-तरुणींची छेड काढणार्‍या रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी जालीम उपाय शोधला असून, त्यांचे फोटो काढून भर चौकात फ्लेक्सवर लावले जाणार आहेत.  File Photo
पुणे

रोडरोमिओंचे फोटो फ्लेक्सवर टांगणार : पोलिस आयुक्त अमितेशकुमार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सवात महिला-तरुणींची छेड काढणार्‍या रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी जालीम उपाय शोधला असून, त्यांचे फोटो काढून भर चौकात फ्लेक्सवर लावले जाणार आहेत. एवढेच नाही तर रोडरोमिओंची परेड देखील पोलिस घेणार आहेत. त्यामुळे महिलांची छेडछाड करात तर सावधान असा सज्जड दमच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी रोडरोमियोंना दिला आहे.

पुण्यातील गणेशोत्सवाची ख्याती सर्वदूर आहे. हा उत्सव पाहण्यासाठी देश विदेशातून नागरिक येत असता. मध्यवस्तीत उत्सवकाळात भाविकांची मोठी गर्दी असते. त्याच गर्दीचा फायदा घेत रोडरोमिओंकडून महिला-तरुणींची छेड काढण्याचे प्रकार घडतात. त्यापार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांना सुचना दिल्या आहेत. सुरक्षेच्यादृष्टीकोनातून पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते आहे. महिलांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते आहे. त्यासाठी महिला पोलिस, दामिनी मार्शलची पथके तैनात करण्यात येणार आहेत. तसेच गुन्हे शाखेच्या पथकांना छेडछाड करणार्‍या रोडरोमिओंची कुंडली तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. महिलांच्या सोबत गैरकृत्य करताना कोणी आढळून आले तर पोलिस त्यांचे फोटो काढून शहरात फ्लेक्सवर नावासह लावणार आहेत. तसेच त्यांची रस्त्यावर परेड सुद्धा घेणार आहेत.

पोलिसांची अठरा मदत केंद्रे

उत्सव काळात भाविकांना माहित आणि सुक्षेच्याबाबतीत गौरसोय होऊ नये म्हणून पोलिसांकडून अठरा मदत केंद्रे उभारण्यात येणार आहेत. शहराच्या मध्यवस्तीत चोवीस तास ही मदत केंद्रे सुरु असणार आहेत. या केंद्रावर स्थानिक पोलिस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग यांचे अधिकारी कर्मचारी काम करणार आहेत.

सहा ठिकाणी शीघ्र कृतीदले तैनात

शहराच्या मध्यवस्तीत प्रमुख सहा ठिकाणी पोलिसांच्या शीघकृतीदलाची पथके तैनात करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने विसर्जन मिरवणूकीच्या मार्गावर ही पथके पहारा देणार आहेत. त्यासाठी मचान बांधण्याची व्यवस्था देखील पोलिसांनी केली आहे.दहा दिवस त्यांच्याकडून उंचावरून सर्व हालचालीवर त्यांच्याकडून लक्ष ठेवले जाणार आहे.

मोबाईल,पाकीटमार चोरट्यांचा बंदोबस्त

गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा चोरटे भाविकांचा लाखोंचा ऐवज लंपास करतात. खास चोर्‍या करण्यासाठी परराज्यातील चोरटे पुण्यात या काळात दाखल होतात. मोबाईल चोरट्यांची संख्या तर फार मोठी असते. कोट्यावधी रुपये किंमतीचे मोबाईल शहरातून चोरी होतात. महिलांचे दागिणे, पैशांची पाकिटे अशा ऐवजावर हात साफ करतात. त्यामुळे त्यांच्या बंदोबस्ताची खास जिम्मेदारी गुन्हे शाखेच्या पथकांवर देण्यात आली आहे. गुन्हे शाखेने आत्तापासूनच याबाबत प्रतिबंधात्मक कामाला सुरुवात केली आहे. चोर्‍या करणार्‍या चोरट्यांची पोलिसांकडून यादी करून ही कारवाई करण्यात येते आहे.त्याचबरोबर परराज्यातून येणार्‍या चोरट्यांवर सुद्धा लक्ष केंद्रीत करून त्यांचे रेकॉर्ड जमा केले जाते आहे.

गणेशोत्सव कालावधीत नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांनी काम सुरू केले आहे. उत्सव शांततेत आणि आनंदात पार पाडण्याची आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे. महिलांच्या सुरक्षेच्या बाबात पोलिस गंभीर आहेत. छेडछाड करणार्‍या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. असे गैरकृत्य करणार्‍यांचे फोटो काढून पोलिस शहरात फ्लेक्सवर लावणार आहेत. तसेच त्यांची परेडही घेतली जाईल हे लक्षात ठेवावे.
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर
SCROLL FOR NEXT